सौरऊर्जेशी संबंधित अभ्यासक्रमांची क्रेझ ! | पुढारी

सौरऊर्जेशी संबंधित अभ्यासक्रमांची क्रेझ !

गणेश खळदकर

पुणे : वाढत्या शहरीकरणामुळे पारंपरिक ऊर्जासाधनांवर मर्यादा येत आहेत. यातूनच आता अपारंपरिक ऊर्जेच्या वाटा शोधल्या जात आहेत. त्यातच आता इलेक्ट्रिक वाहने सौरऊर्जेच्या मदतीने चार्ज करण्याचे संशोधन सुरू असल्यामुळे सौरऊर्जेशी संबंधित अभ्यासक्रमांची निर्मिती होत आहे. अभियांत्रिकीचे विद्यार्थी नवा पर्याय म्हणून संबंधित अभ्यासक्रमांना प्रवेश घेत आहेत. यातून भविष्यात अपारंपरिक क्षेत्रात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना चांगल्या संधी निर्माण होणार असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

शहरीकरणामुळे ऊर्जेची मागणी वाढली आहे. प्रदूषण, तापमानातील वाढ व वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमुळे अपारंपरिक ऊर्जेची गरज भासत आहे. भारताच्या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेतला, तर सौरऊर्जा उत्पादनाला वाव आहे. यातूनच बी. टेक्. इन सोलार अ‍ॅण्ड अल्टर्नेट एनर्जी हा अभ्यासक्रम निर्माण करण्यात आला आहे.

या अभ्यासक्रमात सौरऊर्जा , पवन ऊर्जा, हायड्रो एनर्जी, हवामान बदल, पर्यावरण विज्ञान, अक्षय ऊर्जा, कचरा व्यवस्थापन, हरित वाहतूक आणि ग्रीन कन्स्ट्रक्शन आदींचा समावेश आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सोलर फोटोव्होल्टेइक (पीव्ही) डिझायनर, संशोधन आणि विकास इंजिनियर, सिम्युलेशन इंजिनियर, अक्षय ऊर्जा इंजिनियर, प्रकल्प अभियंता क्षेत्र इंजिनियर, ऊर्जा विश्लेषक, अक्षय ऊर्जा मायक्रो ग्रिड इंजिनियर, अक्षय ऊर्जा एकत्रीकरण तज्ज्ञ आदी संधी उपलब्ध झाल्या आहेत.

‘सौर फार्मिंग’ नवी संकल्पना…

ज्या जागेवर कोणतेच पीक घेतले जाऊ शकत नाही, त्या जागेवर सूर्याची शेती केली जाऊ शकते, म्हणजे ऊर्जानिर्मिती केली जाऊ शकते. यातूनच ’सौर फार्मिंग’ ही एक नवी संकल्पना उदयास आली असून, या ठिकाणी सौरउर्जेशी संबंधित अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना संधी निर्माण झाली असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

भविष्यात ई-वाहने सौरउर्जेवर होणार चार्ज..

सौरऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करण्याच्या पद्धतीला सौर फोटोव्होल्टाइक ऊर्जा असे म्हणतात. अशा संचावर सूर्याची किरणे पडल्यास त्यापासून प्रत्यावर्ती वीजप्रवाह निर्माण होतो. त्यापासून बॅटरी चार्ज करता येते. याचा विचार करूनच भविष्यात इलेक्ट्रिक वाहने सौरऊर्जेवर चार्ज करण्यावर संशोधन सुरू आहे.

रुफटॉप सोलर आणि मिनी मायक्रो-ग्रिड सिस्टीम यांसारख्या लघुस्तरीय अक्षय ऊर्जा प्रकल्पांद्वारे नवीन रोजगार निर्माण होतील. ऊर्जा, पर्यावरण आणि परिषदेने जाहीर केलेल्या अभ्यासानुसार भारताचे अक्षय ऊर्जा क्षेत्र 2030 पर्यंत 10 लाख लोकांना रोजगार देऊ शकेल. जे या क्षेत्राद्वारे कार्यरत असलेल्या अंदाजे 1.1 लाख लोकसंख्येपेक्षा दहापट जास्त असेल.

                              डॉ. प्रकाश गाढे, सहयोगी प्राध्यापक, एमआयटी

जगभरात सुमारे 24 दशलक्ष सौरऊर्जा तसेच हरित ऊर्जेवर आधारित नोकर्‍या उपलब्ध आहेत. पुढील दशकात तंत्रज्ञानातील व्यवसायाच्या संधी सुमारे 1.6 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत उपलब्ध होण्याचा अंदाज जागतिक बँकेतर्फे वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासणार आहे.

                                           – डॉ. गौरी शिऊरकर,
            प्रभारी कुलगुरू, सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी

Back to top button