आळंदी : माउलींच्या पालखीला यंदा जुंपणार भोसलेंची बैलजोडी | पुढारी

आळंदी : माउलींच्या पालखीला यंदा जुंपणार भोसलेंची बैलजोडी

आळंदी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात चांदीच्या रथाला जुंपण्यात येणार्‍या मानाच्या बैलजोडीचा मान यंदा आळंदीतील भोसले कुटुंबाला मिळाला आहे. भोसले कुटुंबातील तुळशीराम नारायण भोसले आणि रोहित चंद्रकांत भोसले यांना यंदाचा मान मिळाला आहे. बैलजोडी निवड समितीने ही निवड केली आहे.

समितीची बैठक नुकतीच माउली मंदिरात झाली. यामध्ये ही निवड करण्यात आली. या वेळी आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, समितीचे अध्यक्ष बबनराव कुर्‍हाडे, उपाध्यक्ष शिवाजीराव रानवडे, नंदकुमार कुन्हाडे, रामदास भोसले, माऊली वहिले आदी सदस्य उपस्थित होते. भोसले यांना बैलजोडीचा मान मिळाल्याने देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आणि बैलजोडी समितीचे अध्यक्ष बबनराव
कुर्‍हाडे यांनी शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला.

या वेळी माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले, पांडुरंग भोसले, संतोष भोसले, गोपीनाथ भोसले, रोहित भोसले तसेच भोसले परिवारातील सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. माउलींच्या पालखी सोहळ्याला बैलजोडी देण्याचा मान हा आळंदी गावातील कुर्‍हाडे, घुंडरे, भोसले, वरखडे, वहिले, रानवडे कुटुंबांनाच मिळतो. आळंदी सोडून बाहेरील ग्रामस्थांना हा मान आजवर दिला गेलेला नाही. कारण, ही प्रथा खूप काळापासून सुरू आहे, असे बैलजोडी समितीचे अध्यक्ष बबनराव कुर्‍हाडे यांनी सांगितले.

Back to top button