कृत्रिम पाणवठे झाले वन्यप्राण्यांना वरदान; जुन्नर वनपरिक्षेत्रातील चित्र | पुढारी

कृत्रिम पाणवठे झाले वन्यप्राण्यांना वरदान; जुन्नर वनपरिक्षेत्रातील चित्र

जुन्नर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : वातावरणात दिवसागणिक होणारा बदल व उन्हाचा तीव्र पारा वाढल्याने जुन्नर तालुक्यातील बहुतांश भागात पाण्याचे जलस्रोत कोरडे पडले आहेत. जुन्नर वनपरिक्षेत्रातील कृत्रिम पाणवठे मात्र वन्यप्राण्यांसाठी वरदान ठरत आहेत.
जुन्नर वनविभागाकडून वनक्षेत्रात बहुतांश ठिकाणी कृत्रिम पाणवठे निर्माण केले आहेत. टँकरने पाणी आणून कृत्रिम पाणवठ्यामध्ये पाणी भरल्यामुळे वन्यप्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. उन्हाळ्यात जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्रोतही आटतात.

वन्यजिवांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. कधी कधी पाण्याच्या या भटकंतीत त्यांना जीवही गमवावा लागतो. त्यामुळे याची दखल घेत वनविभागाने जंगलात वन्यप्राण्यांसाठी छोटे-मोठे सिमेंटचे नव्याने 21 पाणवठे तयार करून त्यात पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. त्यामुळेच काही प्रमाणात वन्यप्राण्यांची भटकंती थांबण्यास मदत होणार आहे. यापूर्वी पाण्याच्या शोधार्थ शेतात घुसलेल्या वन्यप्राण्यांमुळे शेतीच्या नुकसानीच्या घटना घडल्या आहेत.

जंगलात सांबर, मोर, बिबट, रानडुक्कर, वानर, ससे, कोल्हे, तरस, उदमांजर आदी वन्यजीव प्रजातींचा वावर आहे. त्यांच्या सोयीसाठी जुन्नर वनपरिक्षेत्रात तेजेवाडी, हिवरे खुर्द, नेतवड, सावरगाव, निमदरी, चिंचोली मांजरवाडी, हिवरे तर्फे नारायणगाव, आगर, कुसुर, निरगुडे, अंजनावळे, पारुंडे, बुचकेवाडी, हातवीज, आलदरे, डिंगोरे या गावांतील वनक्षेत्रात यंदा नव्याने 21 सिमेंट पाणवठे तयार केले आहेत. मागील काही वर्षांपासून तयार केलेल्या पाणवठ्यांमुळे वन्यप्राणी विहिरीत पडून मृत्युमुखी होण्याच्या घटनांना आळा बसला आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत पाण्याचा पुरवठा करण्याचे नियोजन वनपरिक्षेत्र जुन्नरमार्फत केले आहे.

ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे निर्माण केले आहेत. वन्यजिवांची तहान भागवण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. पाणवठ्यांमध्ये शेतकर्‍यांच्या मदतीने टँकरव्दारे पाणी भरले जाते.
                                         – अजित शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, जुन्नर.

Back to top button