पुणे बाजार समितीवर अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व, भाजपचा बाजार समितीमध्ये शिरकाव | पुढारी

पुणे बाजार समितीवर अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व, भाजपचा बाजार समितीमध्ये शिरकाव

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीच्या सर्वपक्षीय पॅनेलने 18 पैकी 13 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवित राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलचा धुव्वा उडविला आहे. सहकार पॅनेलला केवळ 2 जागाच मिळाल्या आहेत.

विजयामध्ये उर्वरित व्यापारी-अडते 2 आणि हमाल मापाडी 1 अशा मिळून स्वतंत्र 3 उमेदवारांचा समावेश आहे. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससह असलेल्या सर्वपक्षीय पॅनेलच्या मदतीने भाजपने बाजार समितीमध्ये शिरकाव केला आहे. भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य आणि बाजार समितीचे माजी सभापती रोहिदास उंद्रे हे सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहेत. विकास सोसायटी मतदार संघात ‘कपबशी’ या चिन्हाचाच बोलबाला होता. कारण शेतकरी विकास आघाडीला सोसायटी मतदार संघात 11 पैकी 11 जागांवर एकहाती विजय मिळाला. तर ग्रामपंचायत मतदार संघात 2 जागा मिळाल्याने एकूण 15 पैकी 13 जागांवर त्यांनी घवघवीत यश मिळविले आहे.

विजयी उमेदवारांमध्ये रोहिदास उंद्रे 1032, नितिन दांगट 1019, माजी सभापती प्रकाश जगताप 939, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रशांत काळभोर 880, माजी संचालक राजाराम कांचन 854, दत्तात्रय पायगुडे 830 आणि माजी सभापती दिलीप काळभोर 805 हे 7 उमेदवार सर्वसाधारण गटातून विजयी झाले आहेत. या मतदार संघात वैध मते 1604 असून 96 मते बाद झाली.

महिला राखीव मतदारसंघातील दोन्ही जागांवरही शेतकरी आघाडीच्या उमेदवार विजयी झाल्या. त्यामध्ये मनीषा हरपळे 1 हजार 76 मते आणि सारिका हारगुडे 868 मते मिळवून विजयी झाल्या. इतर मागास प्रवर्गातील एका जागेवरही शेतकरी विकास आघाडीचे शशिकांत गायकवाड 860 मतांनी विजयी झाले आहेत. तर भटक्या जाती विमुक्त जमाती गटातून लक्ष्मण केसकर 879 मते मिळवून विजयी झाले आहेत.

गुलालाची मुक्त उधळण, फटाक्यांची आतषबाजी

बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक (पुणे ग्रामीण) प्रकाश जगताप यांनी निवडणुकीचा निकाल जाहिर करताच शिवशंकर सभागृहाबाहेर कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आले. गुलालाची मुक्त उधळण, फटाक्यांची जोरदार आतषबाजी करीत विजयी उमेदवारांना डोक्यावर घेत आनंदोत्सव साजरा केला. तेथून विजयी उमेदवारांसह सर्व कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या मुख्यालयापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढली.

सर्वपक्षीय पॅनेलचाच झेंडा

राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलचे नेतृत्व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले. तर अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीच्या सर्वपक्षीय पॅनेलचे नेतृत्व भाजपचे नेते रोहिदास उंद्रे आणि पुणे जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट यांनी केले. निवडणुकीमध्ये दोन्ही पॅनेल ताकदीने एकमेकासमोर उभे ठाकले होते. यामध्ये पक्षविरोधी भुमिका घेतल्याबद्दल विकास दांगट यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टीची घोषणा गारटकर यांनी केली होती. असे असूनही भाजप, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वपक्षीय पॅनेलच्याच पारड्यात हवेली तालुक्यातील शेतकर्‍यांनी विजयाचे मताधिक्य टाकल्याने बाजार समितीवर सर्वपक्षीय पॅनेलचाच झेंडा फडकला आहे.

“पुणे बाजार समितीच्या निवडणुकीत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्वपक्षीय उमेदवार सामोरे गेलो. सर्वांनी एकदिलाने निवडणूक लढविल्याने त्याचे रुपांतर विजयात झाले आहे. बाजार समिती आणि हवेली तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिने सर्व विजयी उमेदवारांशी चर्चा करुनच पुढील योग्य ते निर्णय घेतले जातील.
– विकास दांगट , नेते, अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी

Back to top button