जागतिक नृत्य दिन विशेष : मुलांमध्ये नृत्य शिक्षणाची क्रेझ; शास्त्रीय नृत्य शिकण्याला प्राधान्य | पुढारी

जागतिक नृत्य दिन विशेष : मुलांमध्ये नृत्य शिक्षणाची क्रेझ; शास्त्रीय नृत्य शिकण्याला प्राधान्य

सुवर्णा चव्हाण

पुणे : अथर्वने हिपहॉप नृत्य शिकण्यासाठी नृत्य वर्गात प्रवेश घेतला आणि बघता-बघता नृत्यात प्रावीण्य मिळवले….आज तो नृत्यात करिअर करण्याचे स्वप्न पाहत आहे. सध्या अथर्वप्रमाणे कित्येक शालेय विद्यार्थी असो वा महाविद्यालयीन तरुण नृत्य शिकण्यावर भर देत असून, नृत्य वर्गांमध्ये जाऊन ते नृत्याचे धडे गिरवत आहेत. त्यामुळेच गेल्या तीन ते चार वर्षांत पुण्यात शास्त्रीय, लोकनृत्य आणि पाश्चिमात्य नृत्य शिकविणार्‍या नृत्य वर्गांची संख्याही दुपटीने वाढली आहे.

पुण्यात सुमारे 2500 हून अधिक नृत्य वर्ग स्थापन झाले असून, त्यामध्ये शास्त्रीय आणि पाश्चिमात्य नृत्य वर्गांची संख्या अधिक आहे. सुमारे 20 हजार हून अधिक नृत्यदिग्दर्शक मुलांना नृत्य शिकवत असून, पुण्यात नृत्य वर्गातून नृत्य शिकण्याची संस्कृती रुजत आहे.
शनिवारी (दि. 28) साजरा होणार्‍या जागतिक नृत्य दिनानिमित्त दै. पुढारीने घेतलेला हा आढावा.

गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यात नृत्य शिकविणे हे व्यवसायाचा एक भाग बनल्याने पुण्यात नृत्यदिग्दर्शकांचा कलही नृत्य वर्ग घेण्याकडे अधिक आहे. म्हणूनच पुण्यामध्ये मध्यवर्ती पेठांसह कोथरूड, डेक्कन परिसर, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, कॅम्प, कोरेगाव पार्क, विमाननगर, हिंजवडी, बाणेर, औंध आदी भागांमध्ये नृत्य वर्गांची संख्या वाढली आहे. 8 ते 18 वयोगटातील शालेय विद्यार्थी आणि 18 वर्षांपुढील तरुणांमध्ये नृत्य शिक्षणाचा फंडा रुजला आहे.

नृत्य परिषद महाराष्ट्रचे कार्याध्यक्ष जतीन माया पांडे म्हणाले, आज पुणे शहरात 2500 हून अधिक नृत्याचे वर्ग कार्यान्वित आहेत. त्यामध्ये शास्त्रीय आणि पाश्चिमात्य नृत्य वर्गांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रातील लोकनृत्य शिकविणारे फारसे वर्ग पुण्यात नाहीत. पुण्यात नृत्य शिकविणार्‍या नृत्य दिग्दर्शकांचे सरासरी वय 25 ते 50 एवढे असून, त्यातील काही जण पाश्चिमात्य नृत्य शिकविण्यावर भर देत आहेत. दूरचित्रवाणीवरील नृत्याचे कार्यक्रम हे प्रशिक्षण देणार्‍या व घेणार्‍या या दोघांच्या आकर्षणाचा विषय बनला असून, त्यातून लगेच यश व प्रसिद्धी मिळावी, यासाठी पालकही मुलांना नृत्य वर्गांमध्ये पाठवू लागले आहेत.

शास्त्रीय नृत्य शिकण्याकडे आधीपासून कल होता, तो आजही कायम आहे. पुण्यात आजच्या घडीला नृत्य वर्ग वाढले असून, नृत्य शिकण्याकडेही अनेकांचा कल आहे, ही सकारात्मक गोष्ट आहे.

                                     – शमा भाटे, ज्येष्ठ नृत्यगुरू

Back to top button