चोरी करताना पाहिल्याने महिलेचा खून; पुण्यातील घटना | पुढारी

चोरी करताना पाहिल्याने महिलेचा खून; पुण्यातील घटना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : हडपसर येथील मांजरी बुद्रुक येथे महिलेचा धारदार हत्यारांनी खून करून मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर हडपसर पोलिसांनी दोन दिवसांत गुन्ह्याचा छडा लावत एकाला अटक केली आहे. त्याने हा खून महिलेने चोरी करताना पाहिल्यामुळे व आपल्याला तुरुंगात जावे लागेल या भीतीने केल्याचा प्रकार या निमित्ताने पोलिसांनी उघड केला आहे.
राजेश अशोक मुळेकर (रा. कवडीपाठ, माळवाडी, लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

उषा अशोक देशमुख (50, खराडी, कवडीपाठ, लोणी काळभोर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत स्नेहल अभय काळभोर (50, रा. मांजरी बुद्रुक, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दि. 24 एप्रिल रोजी शेतावर काम करणाऱ्या हत्यारांनी खून करून नंतर मृतदेह फरफटत नेऊन मांजरी बुद्रुक येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुरण फार्म येथील विहिरीत टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी अज्ञातावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास करत असताना कवडी माळवाडीमधील एक व्यक्ती घटना झाल्यापासून गायब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तसेच चार ते पाच दिवसांपूर्वीच तो कारागृहातून सुटल्याचे समजले. अंमलदार समीर पांडुळे, प्रशांत दुधाळ, निखिल पवार यांना आरोपीविषयी माहिती मिळाली. संशयित आरोपी हा फुरसुंगी भागात एका बिहारी व्यक्तीकडे पेंटिंगचे काम करण्यासाठी गेल्याचे समजले.

राजेश मुळेकरला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने सांगितले, 24 एप्रिल रोजी दुपारी तो संबंधित ठिकाणी विहिरीवरील पाण्याची मोटार चोरी करण्यासाठी गेला होता. मोटार चोरताना उषा देशमुख यांनी त्याला पाहिले. राजेशने सिमेंटची वीट महिलेच्या डोक्यात घातली नंतर कोयत्याने वार करत तिचा खून केला. नंतर तिला विहिरीत टाकले. आरोपीला जेरबंद करण्याची कामगिरी अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे निरीक्षक दिगंबर शिंदे, विश्वास डगळे, सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, सुशील लोणकर, संदीप राठोड, शाहीद शेख, सचिन जाधव, प्रशांत टोनपे यांच्या पथकाने केली.

Back to top button