पुणेकरांच्या डिकीत वर्षभर रेनकोट; अविरत पाऊस | पुढारी

पुणेकरांच्या डिकीत वर्षभर रेनकोट; अविरत पाऊस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : यंदा शहरात वर्षभर पाऊस सुरू असल्याने पुणेकरांच्या दुचाकीच्या डिकीत रेनकोटही वर्षभर ठेवावा लागला. हिवाळ्यातही पाऊस सुरूच असल्याने चक्क स्वेटरवर रेनकोट घालण्याची वेळ आली होती. यंदा उन्हाळ्यात सलग पन्नास दिवस पावसाचा तडाखा सुरूच आहे. हवामानातील बदलांमुळे यंदा संपूर्ण देशासह पुणे शहरातही पावसाचे प्रमाण वर्षभर वाढले आहे. एकही महिना असा गेला नाही, की ज्यात पाऊस झाला नाही. वर्षभर कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याने हा परिणाम जाणवत आहे.

बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे वर्षभर वाहत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यातही आर्द्रता वाढत आहे. त्यामुळे पाऊस पडूनही खूप उष्मा जाणवत आहे. एप्रिल 2022 ते एप्रिल 2023 असा वर्षभराचा विचार केला, तर शहरात 880 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. उन्हाळ्यात यंदा शहरात 79 टक्के पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाला आहे. मार्चमध्ये 70 टक्के अधिक, तर एप्रिलमध्ये 79 टक्के अधिक पाऊस झाला.

प्रत्येक महिन्यात सरासरीपेक्षा जास्तच पाऊस…

आता पाऊस कधी येईल, त्याचा नेम नाही, असे म्हणत पुणेकरांना वर्षभरच रेनकोट गाडीच्या डिकीत ठेवावा लागत आहे. मोबईलवर अलर्ट पाहून निघण्यापेक्षा डिकीत रेनकोट ठेवलेला बरा, असा विचार करणार्‍यांची मात्र धावपळ झाली नाही. पाऊस येताच गाडी थांबवून लागलीच रेनकोट घालण्याची सवय आता पुणेकरांना झाली आहे. यंदा प्रत्येक महिन्याची सरासरी पावसाने केवळ गाठली नाही, तर त्यापेक्षा 30 ते 50 टक्क्यांपेक्षा अधिकच पाऊस झाला आहे.

वार्‍याची खंडितता वाढल्याने (कमी दाबाचे पट्टे) शहरावर सतत तयार होऊन बाष्पयुक्त ढगांची गर्दी जास्त होत आहे. दिवसभर कडक ऊन, तर सायंकाळी पाऊस हे गणित पावसाचे आता ठरले आहे.
                                            – माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ

12 ते 15 मीटर उंचीचे शहरावर ढग

कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने बाष्पयुक्त वार्‍यांचा शहरावर प्रभाव वाढला. त्यामुळे शहरावर 12 ते 15 मीटर उंचीचे ढग तयार होण्याची प्रक्रिया वाढली आहे. त्यांच्या प्रभावामुळे रोज थोडा तरी पाऊस शहरात होत आहे.

Back to top button