जलसंपदाच्या उलट्या बोंबा, मुंढव्यातून पाणी घेत नाहीत; पुण्यावर मात्र कपातीचा दबाव | पुढारी

जलसंपदाच्या उलट्या बोंबा, मुंढव्यातून पाणी घेत नाहीत; पुण्यावर मात्र कपातीचा दबाव

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : मुळा-मुठा नदीतून मुंढवा जॅकवेल येथून पाणी उचलून सिंचनाला पुरविण्यामध्ये जलसंपदा विभाग कमी पडत आहे. तेथील जुना बेबी कालवा नादुरुस्त असल्याचे कारण जलसंपदाचे अधिकारी सांगत आहेत. मात्र, त्याचवेळी खडकवासला धरणातून कालव्याद्वारे जास्तीत जास्त पाणीपुरवठा सिंचनासाठी करण्यावरच त्यांचा भर आहे. त्याचबरोबर पुणेकर जादा पाणी वापरत असून, त्यांनी पाणीकपात करावी, असे ते अप्रत्यक्षरीत्या सुचवीत आहेत.

खडकवासला धरणसाखळीत पुरेसे पाणी शिल्लक आहे. दरवर्षी मुंढवा येथून सहा अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्याची यंत्रणा महापालिकेने उभारली. त्यासाठी सुमारे शंभर कोटी रुपये खर्च केले. जलसंपदा विभागानेही त्या वेळी कालवा दुरुस्तीसाठी काही लाख रुपये खर्च केले. मात्र, त्या कालव्यातून नदीतील पाणी नेण्यास त्यांची फारशी तयारी दिसत नाही. प्रारंभी नदीचे पाणी दूषित असल्याचे शेतक-यांचे म्हणणे होते.

मात्र, पाणी कमी पडत असताना, धरणांतील पाणी शिल्लक ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाने गांभीर्याने नियोजन करण्याची आवश्यकता आहे. खासदार वंदना चव्हाण यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये मुंढव्यातून पाणी का घेत नाही, असा प्रश्न विचारला. त्या वेळी, बेबी कालवा दुरुस्त नसल्याचे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांनी सांगितले. त्यामुळे, त्या कालव्यातून अधिक प्रमाणात पाणी नेता येत नसल्याचा खुलासा त्यांना केला. या निर्णयाचा फटका पुणेकरांना बसणार आहे.

काय आहे मुंढवा प्रकल्प…

पुणेकरांना अधिकचे पाणी देण्यासाठी पुणे महापालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते साडेसहा टीएमसी पाणी परत नदीत सोडावे. ते पाणी पुन्हा शेतीला सिंचनासाठी देता येईल, असे ठरले होते. त्यानुसार, महापालिकेच्या खर्चाने जलसंपदा विभागाने मुळा-मुठा नदीवर 120 मीटर लांबीचा बंधारा बांधला. बंधा-यालगत मुंढवा येथे जॅकवेल बांधले. तेथे आठ पंप बसविण्यात आले. तेथून 2700 मिलिमीटर व्यासाची दाबनलिका साडेचार किलोमीटर टाकण्यात आली. 2015 मध्ये ही योजना कार्यान्वित करण्यात आली.

जलसंपदा विभागाने त्यानंतर एकाही वर्षी सहा टीएमसी पाणी घेतले नाही. कालवा दुरुस्त नसल्याने, रोज किती पंप सुरू ठेवावेत, ते जलसंपदा विभाग महापालिकेला कळविते. कालपर्यंत दोन पंपच सुरू ठेवले होते. आज त्यांनी चार पंप सुरू ठेवण्यास सांगितले. एका पंपाद्वारे प्रतिदिन 80 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलले जाते. गेल्या सात वर्षांत सर्वाधिक पाणी 2018 मध्ये 3.53 टीएमसी घेण्यात आले होते.

बेबी कालवा शंभर वर्षांपेक्षा जुना असल्याने तो ठिकठिकाणी लवकर भरून पाणी बाहेर पसरते. कालव्यात जलपर्णी व राडारोडा आहे. तो दुरुस्त नसल्याने कालव्यातून पूर्ण क्षमतेने पाणी सोडता येत नाही.

           – विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग

Back to top button