मंचर : तब्बल 22 पाणवठे करून वन्यप्राण्यांची सोय

मंचर : तब्बल 22 पाणवठे करून वन्यप्राण्यांची सोय

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील वनविभाग कार्यालयाकडून जंगल क्षेत्रात बहुतांश ठिकाणी 22 पाणवठे निर्माण करून वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे, ही माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एम. बी. गारगोटे यांनी दिली. घोडेगाव वनपरिक्षेत्रात भेकर, सांबर, मोर, बिबट, रानडुक्कर, वानर, ससे, कोल्हे, लांडगे, तरस, साळींदर, उदमांजर आदी वन्यजीव तसेच विविध प्रजातींचा वावर असतो.

परंतु उन्हाळ्यात जंगलातील पाणी संपते, तसेच पाण्याचे नैसर्गिक स्रोतही आटतात. कडक पडणार्‍या उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी जंगल सोडून भटकंती करावी लागते. परिणामी, वाड्या-वस्तीवरील कुर्त्यांकडून त्यांची शिकार होते. याची दखल घेत वनविभागाने जंगलात वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार करून त्यात पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.

पाणवठ्यात टँकरच्या माध्यमातून पाणी आणून हे पाणवठे पाण्याने भरल्यामुळे वन्यप्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. त्यामुळेच काही प्रमाणात वन्यप्राण्यांची भटकंती थांबण्यास मदत होणार आहे. येथील जंगलात वन्यप्राण्यांची उन्हाळ्यात होणारी भटकंती थांबवण्यासाठी वनविभागाकडून दरवर्षी उपाययोजना केल्या जातात. त्या अनुषंगाने ढाकाळे, आमोंडी, कोळवाडी, कोटमदरा या वनपरिक्षेत्रात पाणवठे निर्माण करण्यात आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.

पावसाळा सुरू होईपर्यंत याठिकाणी पाण्याचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे निर्माण करण्यात आले असून, त्याद्वारे वन्यजीवांची तहान कशी भागेल यासाठी उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. पाणवठ्यामध्ये टँकरव्दारे पाणी टाकून वन्यप्राण्यांकरिता पाणवठे भरले जात आहे.

                              – एम. बी. गारगोटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, घोडेगाव.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news