शिरूरच्या पुर्व भागात अवकाळी पाऊस; कांदा पिकांचे मोठे नुकसान | पुढारी

शिरूरच्या पुर्व भागात अवकाळी पाऊस; कांदा पिकांचे मोठे नुकसान

मांडवगण फराटा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शिरूरच्या पूर्व भागामध्ये अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. २८ एप्रिलला सकाळपासून या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पाऊसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. कांदा काढण्यासाठी मजूर मिळत नाहीत, आणि त्यामध्ये अधून मधून पाऊस येत असल्यामुळे कांदा काढायचा तरी कसा हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

अवकाळी पाऊस मात्र, शेतकऱ्याची पाठ काही सोडेना त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची कांदा काढणी रखडली आहे. काही शेतकऱ्यांचा कांदा शेतामध्ये पडून होता, त्यामुळे कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू होती. तर अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतामध्ये पावसाने भिजून गेला. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे देखील या परिसरामध्ये अनेक ठिकाणी ऊस, गहू भुईसपाट झाला होता. मांडवगण फराटा, सादलगांव, इनामगाव, तांदळी, गणेगाव दुमाला, शिरसगाव काटा, वडगांव रासाई, कुरूळी आदी गावातील शेतकऱ्यांची कांदा काढणे सुरू आहे. अचानक पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू. झाल्याचे चित्र या परिसरामध्ये दिसून येत होते. त्यामुळे शासनाकडून त्वरित पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी अशी मागणीशेतकऱ्यांनी केली.

Back to top button