राज्यातील क्रीडा गुणांची सवलत अडकली लालफितीत | पुढारी

राज्यातील क्रीडा गुणांची सवलत अडकली लालफितीत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील ऑलिम्पिक, एशियन, कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये खेळल्या जाणार्‍या क्रीडा प्रकारांना ग्रेस गुण दिले जातात. परंतु, राज्यातील 44 क्रीडाप्रकारांना ग्रेस गुण मिळत नाहीत. क्रीडा खात्याच्या कारभारातील लालफितीत हा ग्रेस गुणांचा निर्णय रखडला असल्याचे समोर आले आहे.

राज्यातील 44 क्रीडा प्रकारांतील लाखो खेळाडूंना शासनाच्या 15, 20, 25 गुणांची सवलत मिळावी, अशी अनेक वर्षापासूनची खेळाडूंसह संघटनांचीही मागणी आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षापासून हा विषय रखडलेला आहे. यासदंर्भात वारंवार बैठका होत असल्यातरी निर्णय मात्र होत नाही. क्रीडा संघटनांनीही क्रीडा अधिकार्‍यांना अपेक्षित सर्व कागदपत्रे सादर करूनही मानसिकता नसल्याने हा निर्णय रखडलेला आहे.

क्रीडापटूंसाठी शालेय खेळ-क्रीडा बचाव समितीच्या वतीने क्रीडा आयुक्तांकडे वारंवार निवेदने देऊन आंदोलने केली गेली आहेत.
अखेर गेल्या आठवड्यामध्ये मंत्रालयात अधिकारी आणि समितीच्या पदाधिकार्‍यांमध्ये बैठक होऊन क्रीडा आयुक्तांकडून अभिप्राय मागविला आहे. हा अभिप्राय सादर करताना पुन्हा एकदा सर्व 44 क्रीडा संघटनांकडून कागदपत्रांची मागणी केली असून, शासनाच्या अशा लालफितीच्या कारभारात खेळाडू मात्र भरडला जात आहे.

राज्यातील 44 क्रीडा प्रकारांच्या गुण सवलतीबाबत मंत्रालयामध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक झाली आहे. त्यासंदर्भात क्रीडा आयुक्तांकडे अभिप्राय मागविला आहे. 44 क्रीडा संघटनांचे पदाधिकारी संपूर्ण माहिती सादर करणार असून, 3 मे रोजी आम्ही सर्व माहिती क्रीडा आयुक्तांना पुन्हा एकदा देणार आहोत. यापूर्वीही सर्व माहिती दिलेली आहे. परंतु, ग्रेस गुणांचा विषय आता मार्गी लागणे गरजेचे आहे.

                   – श्याम भोसले, अध्यक्ष, शालेय खेळ-क्रीडा बचाव समिती

Back to top button