घाटघरला गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून युवकाचा खून | पुढारी

घाटघरला गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून युवकाचा खून

जुन्नर; पुढारी वृत्तसेवा : जुन्नरच्या आदिवासी भागातील घाटघर येथे गावयात्रेतील तमाशा पाहण्याकरिता दुचाकीवरून दोघे जण जात असताना रस्त्यावरून पायी जाणार्‍या पाच तरुणांपैकी एकाला दुचाकीचा धक्का लागला. त्यामुळे या पाच जणांनी दुचाकीवरील दोघांना मारहाण केली. यापैकी एकाला लाकडी दांडक्यांनी केलेल्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाल्याने ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पाच तरुणांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर तीन जण फरारी आहेत.

जिजाराम रामदास सुपे (वय 39, रा. आंबेहातविज, ता. जुन्नर) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी राहुल रमेश शिंदे, तुषार जयवंत खरात, शुभम सुरेश डामसे, संकेत सुनिल डोळस व एक अल्पवयीन मुलगा (सर्वजण रा. इंगळून, ता. जुन्नर) यांच्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीताराम सुपे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

सीताराम व जिजाराम हे दोघेजण दुचाकीने दि. 18 एप्रिल रोजी आंबेहातविज येथून घाटघर येथे तमाशा पाहण्याकरिता जात होते. त्या वेळी इंगळून येथून हे पाच तरुण रस्त्याने पायी जात असताना एकाला या दुचाकीचा धक्का लागला. त्यामुळे चिडून जाऊन या पाच जणांनी मिळून दोघांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

जिजाराम याला लाकडी दांडक्यांनी जबर मारहाण केल्याने जखमी अवस्थेत त्यांना जुन्नर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथून ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेतील पाच जणांपैकी दोघांना अटक करण्यात आली असून, यामधील अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात दाखल करण्यात आले आहे, तीन फरारी आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक नारायण पवार, अंमलदार वाल्मिक शिंगोटे करीत आहेत.

Back to top button