सुषमा अंधारेंचा आमदार शिरसाटांच्या विरुद्ध तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा | पुढारी

सुषमा अंधारेंचा आमदार शिरसाटांच्या विरुद्ध तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या कथित वादग्रस्त विधानाबाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दिवाणी व फौजदारी स्वरुपाचा दावा दाखल केला आहे. दिवाणी दाव्यात त्यांनी तीन रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, असे नमूद केले आहे.

आमदार शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी पुणे पोलिसांकडे करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला नाही. दरम्यान, अंधारे यांच्या वतीने मानहानीबाबत नोटीस बजावली होती. त्यामध्ये, त्यांनी सात दिवसांत खुलासा करण्याची मागणी केली होती. त्यांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न आल्याने अंधारे यांनी अ‍ॅड. तौसिफ शेख व अ‍ॅड. क्रांतीलाल सहाणे यांच्या मार्फत मंगळवारी न्यायालयात दिवाणी व फौजदारी स्वरुपाचा दावा दाखल केला. त्यानुसार दिवाणी दाव्यात न्यायालयामार्फत शिरसाट यांना नोटीस काढण्यात येईल. तर, फौजदारी दाव्यात त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश होतील. अन्यथा त्यांच्या विरोधात समन्स काढण्यात येईल, अशी माहिती अंधारे यांचे वकील अ‍ॅड. शेख व अ‍ॅड. सहाणे यांनी दिली. याखेरीज, अ‍ॅड. दीपक गायकवाड, अ‍ॅड. स्वप्नील गिरमे, अ‍ॅड. महेश गवळी यांनी याप्रकरणात काम पाहिले.

Back to top button