ओतूर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: वृद्ध महिला घरात एकटीच असताना दोघांनी पॉलीश करण्याच्या बहाण्याने तिचे मंगळसूत्र लांबविले. ही घटना गुरुवारी (दि. २७) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ओतूर येथील शिवाजी रोड परिसरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंजुळा लक्ष्मण गीते (वय ६७, रा. शिवाजी रोड ५२ गल्ली, ओतूर, ता.जुन्नर) या वृद्ध महिला आपल्या पतीसह राहतात. त्यांची मुले नोकरीनिमित्त बाहेरगावी असून त्यांच्या पतीला ऐकू येत नाही. गुरुवारी सकाळी पती बाहेर फेरफटका मारण्यासाठी गेले होते. दरम्यान हलका पाऊस येत असल्याने दोघे अज्ञात व्यक्ती त्यांच्या दारात उभे राहिले. त्यातील एकाने घरात प्रवेश मिळवत आम्ही वस्तुंना पॉलिश करून देतो, असे म्हणत देवघरातील देव आपल्या जवळच्या पावडरने पॉलिश करून दिले. नंतर वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र पॉलिश करून देण्याचा त्यांनी बहाणा केला. मात्र, मंजुळा यांनी त्याला नकार दिल्यानंतरही या भामट्यांनी त्यांना मंगळसूत्र गळ्यातून काढायला लावत ते गॅसवर एका भांड्यात उकळत्या पाण्यात ठेवण्याचे नाटक केले. काही वेळातच लगोलग दोन्ही भामटे दुचाकीवरून पसार झाले.
वृद्ध महिलेने गॅसवर ठेवलेल्या भांड्यात मंगळसूत्र आहे की, नाही याची तपासणी केली असता ते मंगळसूत्र नाहीसे झाल्याचा प्रकार उघड झाला. याबाबत ओतूर पोलिसात तातडीने खबर दिली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांनी आपल्या सहकाऱ्यांमार्फत तात्काळ माळशेज घाट, डुंबरवाडी टोलनाका आणि कारखाना फाटा येथे नाकाबंदी करून तपास केला. परंतु, चोरटे मिळून आले नाहीत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले. कदाचित हे चोरटे ओतूर परिसरातच दडून बसले असावेत व ते रात्र झाल्यावर बाहेर पडू शकतात, या शक्यतेने नाकाबंदी कायम करण्यात आल्याचे सहायक पोलिस निरीक्षक कांडगे यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले.