बारामतीत कालिचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

बारामतीत कालिचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बारामतीत ९ फेब्रुवारी रोजी आयोजित ‘हिंदू गर्जना’ मोर्चात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कालिचरण महाराज ऊर्फ अभिजित धनंजय सराग (रा. अकोला) व आयोजक विकास महादेव देवकाते (रा. बांदलवाडी, ता. बारामती) यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भादंवि कलम १५३ अ तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी अतुल जाधव यांनी याबाबत दि. २५ एप्रिल रोजी फिर्याद दिली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, बारामतीत ९ फेब्रुवारी रोजी हिंदू गर्जना मोर्चा पार पडला. या मोर्चाची व्हिडीओ क्लिप पोलिसांनी बारकाईने बघितली असता त्यामध्ये जातीय तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य केल्याचे निदर्शनास आले.

वास्तविक मोर्चापूर्वी देवकाते यांना पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडील आदेशानुसार जमावबंदी लागू असल्याने अटीचे उल्लंघन करू नये, अशी नोटीस दिली होती. शहरातील तीन हत्ती चौकात मोर्चाचा समारोप झाला. तेथे कालिचरण महाराज यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल, अशी वादग्रस्त वक्तव्ये करत अफवा पसवण्याचा प्रयत्न केला. आयोजक देवकाते यांनी नोटीस स्वीकारल्यानंतर त्याचे उल्लंघन केले असल्याचे म्हटले आहे.

Back to top button