भीमाशंकर सहकारी पॅनेलच्या उमेदवारांना विजयी करा ; माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आवाहन | पुढारी

भीमाशंकर सहकारी पॅनेलच्या उमेदवारांना विजयी करा ; माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आवाहन

मंचर : पुढारी वृत्तसेवा : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अटी आणि शर्तींवर चालत नसून सर्व नेतेमंडळींच्या विचारावर चालत असतो. सहकारी संस्था आमच्या मालकीच्या नसून त्या जनतेच्या आहेत. आपल्याला संस्था वाढविण्यासाठी काम करायचे आहे. कुणीही फोटो वापरला, तरी महाविकास आघाडीच्या भीमाशंकर सहकारी पॅनेलच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे,’ असे आवाहन माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केले. मंचर (ता. आंबेगाव) येथील शिवगिरी मंगल कार्यालयात मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात मतदारांना मार्गदर्शन करताना माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे पाटील बोलत होते.

या वेळी व्यासपीठावर शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर, काँग्रेस आय पक्षाचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार, लाला बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले, कुलस्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष शंकरशेठ पिंगळे, उद्योजक रमेशशेठ लबडे, अरविंद वळसे पाटील, सुषमाताई शिंदे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वळसे पाटील पुढे म्हणाले की, ‘आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे नेण्यासाठी तसेच मला विविध पदांवर पोहचविण्यासाठी तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मोलाची मदत केली आहे. मात्र, तालुक्यात तरुणांना संधी देणे गरजेचे आहे. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी विचार करून एकमताने बाजार समितीसाठी उमेदवार निवडले आहेत. त्यावर हरकत घेण्याची गरज नव्हती. कुणी माझा फोटो वापरला किंवा झेंडा वापरला, तरी गडबडून जाऊ नका. मी या ठिकाणी जो उभा आहे,

तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उभा आहे, असे समजावून येणार्‍या 28 तारखेला आपल्या पॅनेलच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा,’ असे आवाहनही वळसे पाटील यांनी केले. या वेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, आंबेगाव तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर, काँग्रेस आय पक्षाचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे अध्यक्ष अंकित जाधव, कुलस्वामी पतसंस्थेचे संचालक भास्कर डोके, उमेदवार वसंतराव भालेराव, नीलेश थोरात यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन नीलेश पडवळ यांनी केले. सचिन भोर यांनी आभार मानले.

गेली 30 ते 35 वर्षे तालुक्याच्या विकासाची घोडदौड चालू आहे. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. पक्षश्रेष्ठी किंवा तालुक्यातील जनतेसाठी माझ्याकडून चुकीचे काम झाले, तर जनता सांगेल त्याच दिवशी मी थांबायला तयार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत देवदत्त निकम यांनी उमेदवारी मागताना मला सभापती घोषित करा, नाहीतर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांचा राजीनामा घेऊन मला कारखान्याचे अध्यक्ष करा, अशी अट घातली होती. त्यांच्या अटी न पटणार्‍या होत्या.

दिलीप वळसे पाटील, माजी गृहमंत्री, आमदार

मंचर बाजार समितीच्या गत संचालकांमधून कोणालाही या वेळी उमेदवारी देण्यात आली नाही. सद्य:स्थितीतील निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार सुशिक्षित आणि लोकाभिमुख आहेत. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून बाजार समितीचा गतिमान विकास केला जाईल.
                                                 देवेंद्र शहा, अध्यक्ष, शरद बँक, मंचर

मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद
मंचर बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित शेतकरी मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शिवगिरी मंगल कार्यालयाचे ठिकाण अपुरे पडले. कार्यालयाबाहेर शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार एकतर्फी विजयी होतील, असे उपस्थित जनसमुदायाच्या उत्साही वातावरणामुळे दिसून आले.

Back to top button