पुणे : सिगारेट बॉक्स चोरी करणारी टोळी जेरबंद | पुढारी

पुणे : सिगारेट बॉक्स चोरी करणारी टोळी जेरबंद

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  किराणा मालाचे दुकान फोडून सिगारेटचे बॉक्स चोरणार्‍या आंतरराज्य टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 4 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरलेल्या सिगारेटचे बॉक्स कमी किंमतीत विकून चोरटे पैसे मिळवित असल्याचे तपासात समोर आले आहे. बुधाराम बियाराम चौधरी (वय 45, रा. वडगाव शेरी, मूळ – रा. राणी वाल, ता. जितारण, जि. पोली, राजस्थान) रामलाल ढगळाराम चौधरी (वय 29) आणि महावीर बगदाराम मेघवंशी (वय 19, दोघेही रा.दत्तवाडी, मूळ-राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

नाना पेठमधील जय अंबे ट्रेडर्स किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी 5 लाख 10 हजारांची सिगारेट पाकिटे चोरून नेली होती. युनिट एककडून आरोपींचा शोध सुरू होता. तांत्रिक विश्लेषणाद्वारे तीन रिक्षांतून प्रवास करीत वडगाव शेरीत उतरल्याचे निष्पन्न झाले. पोलिस कर्मचारी आण्णा माने, अमोल पवार यांना आरोपींची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सैय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपी बुधारामला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने नाना पेठेतील दुकानातून सिगारेटची चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या दोन साथीदारांनाही पथकाने अटक केली.

तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी बुधारामने मंडईतील दुकानातूनही सिगारेट चोरल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध यापूर्वी विश्रामबाग, कोंढवा, समर्थ, हडपसर परिसरात घरफोडी, चोरीचे 10 गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे,पोलिस निरीक्षक शब्बीर सैय्यद, सहायक पोलिस निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक अजय जाधव, सुनील कुलकर्णी, कर्मचारी इम—ान शेख, नीलेश साबळे, शुभम देसाई,दत्ता सोनावणे, महेश बामगुडे, विठ्ठल साळुंखे, अय्याज दड्डीकर यांच्या पथकाने केली.

Back to top button