संतोष शिंदे
पिंपरी : 'डीजे शो' ला होणार्या तरुणांच्या वाढत्या गर्दीमुळे पोलिसांची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी एमएसईबी, पीडब्ल्यूडीसह शासनाच्या विविध विभागांकडील 'ना-हरकत' दाखले सादर करून पोलिसांची परवानगी घेणे आयोजकांना बंधनकारक केले आहे. या बाबतचे आदेश पुणे तसेच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी काढले आहेत. विनापरवाना कार्यक्रम घेतल्यास कारवाईचा इशारादेखील देण्यात आला आहे. त्यामुळे नृत्यांगना असलेले डीजे डान्स शो घेणे सोपे राहिले नाही.
पोलिस आयुक्त कार्यालयात आयोजकाने अर्ज करावा. तेथून अर्ज संबंधित पोलिस ठाणे, पोलिस उपआयुक्त कार्यालयामार्फत पुन्हा आयुक्त कार्यालयात येतो. अर्जासोबत गोपनीय अहवाल दिला जातो. त्यानुसार, वरिष्ठांकडून परवानगीचा निर्णय घेतला जातो.
पोलिसांच्या परवानगीसाठी आयोजकांना महापालिका, पीडब्ल्यूडी, महावितरणसह विभागांचे 'ना हरकत परवाने' प्राप्त करावे लागणार आहेत.
कोणताही परवाना न घेता कार्यक्रम आयोजित केल्याने पोलिसांना वाहतुकीचे ऐनवेळी नियोजन करता येत नाही. ज्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतर मोठी वाहतूक कोंडी होते. कोंडीत अडकलेले चालक पोलिस नियंत्रण कक्षाकडे मदत मागतात. त्या वेळी पोलिसांची मोठी दमछाक होते.
मागील काही दिवसांपूर्वी एक नृत्यांगना 'डीजे शो' मध्ये अश्लील हावभाव करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. याचे पडसाद राज्यभर उमटले. त्यानंतर संबंधित नृत्यांगना असलेल्या डीजे शो पाहण्यासाठी तरुण मोठ्या संख्येने जमा होत आहेत. अशा वेळी किरकोळ कारणावरून वाद होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमात कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर असते.
कार्यक्रम आयोजित करताना आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करून पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे. ज्यामुळे पोलिस सर्वतोपरी तयारीत राहतात. कार्यक्रमात एखादी अनुचित घटना घडल्यास परिस्थिती हाताळणे अवघड होते.
– सतीश माने,
सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी