‘डीजे’ डान्सला लगाम ! पोलिसांच्या परवानगीशिवाय कार्यक्रम घेतल्यास होणार कारवाई | पुढारी

‘डीजे’ डान्सला लगाम ! पोलिसांच्या परवानगीशिवाय कार्यक्रम घेतल्यास होणार कारवाई

संतोष शिंदे 

पिंपरी : ‘डीजे शो’ ला होणार्‍या तरुणांच्या वाढत्या गर्दीमुळे पोलिसांची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी एमएसईबी, पीडब्ल्यूडीसह शासनाच्या विविध विभागांकडील ‘ना-हरकत’ दाखले सादर करून पोलिसांची परवानगी घेणे आयोजकांना बंधनकारक केले आहे. या बाबतचे आदेश पुणे तसेच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी काढले आहेत. विनापरवाना कार्यक्रम घेतल्यास कारवाईचा इशारादेखील देण्यात आला आहे. त्यामुळे नृत्यांगना असलेले डीजे डान्स शो घेणे सोपे राहिले नाही.

…असा मिळवा परवाना

पोलिस आयुक्त कार्यालयात आयोजकाने अर्ज करावा. तेथून अर्ज संबंधित पोलिस ठाणे, पोलिस उपआयुक्त कार्यालयामार्फत पुन्हा आयुक्त कार्यालयात येतो. अर्जासोबत गोपनीय अहवाल दिला जातो. त्यानुसार, वरिष्ठांकडून परवानगीचा निर्णय घेतला जातो.

आयोजकांना पायपीट

पोलिसांच्या परवानगीसाठी आयोजकांना महापालिका, पीडब्ल्यूडी, महावितरणसह विभागांचे ‘ना हरकत परवाने’ प्राप्त करावे लागणार आहेत.

या कार्यक्रमांना परवानगी आवश्यक
  • सार्वजनिक मोकळ्या ठिकाणी तसेच इमारतींमध्ये होणारे मनोरंजनपर कार्यक्रम
  • विदेशी कलाकारांचा सहभाग असलेले कार्यक्रम
  • ज्या कलाकारांच्या कृतीने अथवा वक्तव्यावर वाद निर्माण झाला आहे
  • पटकथा प्रदर्शनामुळे वादविवाद निर्माण झाले आहेत.
  • कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी, संपल्यानंतर वाहतूक कोंडी झाल्याची नोंद आहे.
  • कायदा व सुव्यवस्थेची बाब निर्माण झाली आहे
  • कार्यक्रमास 2000 किंवा त्यापेक्षा जास्त जनसमुदाय उपस्थित होण्याची शक्यता आहे.
या कागदपत्रांची करावी लागणार पूर्तता
  •  जागामालकाचे ना हरकत प्रमाणपत्र
  •  एमएसईबी विभागाकडील ना हरकत प्रमाणपत्र
  • अग्निशमन विभागाकडील ना हरकत प्रमाणपत्र
  • महापालिकेकडील ना हरकत प्रमाणपत्र
  • आरोग्य निरीक्षक यांचे ना हरकत प्रमाणपत्र
  • खाद्य पदार्थासाठी फूड अ‍ॅन्ड ड्रग्ज विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र
  • कार्यक्रमाच्या ठिकाणचा जागेचा पार्किंगसह नकाशा
  • वाहतूक विभागाकडील ना हरकत प्रमाणपत्र
  • सशुल्क पोलिस बंदोबस्तासाठी संबंधित उपआयुक्त यांचे पत्र
  • परकीय कलाकार असल्यास गृहमंत्रालय, मुंबई यांचा परवाना
  • स्टेजसाठी पीडब्ल्यूडी विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र

कोंडी फोडताना होते दमछाक

कोणताही परवाना न घेता कार्यक्रम आयोजित केल्याने पोलिसांना वाहतुकीचे ऐनवेळी नियोजन करता येत नाही. ज्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतर मोठी वाहतूक कोंडी होते. कोंडीत अडकलेले चालक पोलिस नियंत्रण कक्षाकडे मदत मागतात. त्या वेळी पोलिसांची मोठी दमछाक होते.

पोलिसांवर मोठी जबाबदारी

मागील काही दिवसांपूर्वी एक नृत्यांगना ‘डीजे शो’ मध्ये अश्लील हावभाव करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. याचे पडसाद राज्यभर उमटले. त्यानंतर संबंधित नृत्यांगना असलेल्या डीजे शो पाहण्यासाठी तरुण मोठ्या संख्येने जमा होत आहेत. अशा वेळी किरकोळ कारणावरून वाद होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमात कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर असते.

कार्यक्रम आयोजित करताना आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करून पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे. ज्यामुळे पोलिस सर्वतोपरी तयारीत राहतात. कार्यक्रमात एखादी अनुचित घटना घडल्यास परिस्थिती हाताळणे अवघड होते.

                                              – सतीश माने,
                                 सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी

Back to top button