पुणे : पीएमआरडीएकडून लवकरच पीएमपीला संचलन तूट | पुढारी

पुणे : पीएमआरडीएकडून लवकरच पीएमपीला संचलन तूट

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पीएमपीला 188 कोटी रुपयांची संचलन तूट देण्यासंदर्भातील निर्णय पीएमआरडीएच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. ही बैठक लवकरच होणार असून, या बैठकीनंतर पीएमपीला लवकरच संचलन तूट मिळण्याची चिन्हे आता निर्माण झाली आहे. पीएमपीकडून गेल्या अनेक दिवसांपासून पीएमआरडीए भागात बससेवा पुरविली जात आहे. या सेवेमुळे पीएमपीला एकूण 188 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाकडून पीएमआरडीए प्रशासनाला संचलन तूट मिळावी, अशी सातत्याने मागणी होत होती. अखेर मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर पीएमपीच्या संचालक मंडळात पीएमआरडीए आयुक्तांचा समावेश करण्यास मान्यता मिळाली. त्यामुळे आता पीएमपीला संचलन तूट मिळणार आहे.

पहिल्या टप्प्यात तीन जागा
पीएमपी प्रशासनाने पीएमआरडीए भागात सेवा पुरविण्याच्या बदल्यात संचलन तूट आणि डेपो बसस्थानके, थांबे यांकरिता जागा मागितली आहे. पीएमआरडीएने रावेत, मोशी, भोसरी मध्यवर्ती केंद्र या तीन जागा मिळाव्यात आणि नंतर आराखड्यातील 9 जागा मिळाव्यात, अशी मागणी केली आहे.

आम्ही पीएमआरडीए प्रशासनाला बससेवा पुरविण्याच्या बदल्यात 188 कोटी रुपयांची संचलन तूट मागितली आहे. त्याबाबत आमची चर्चा सुरू आहे. लवकरच संचालक मंडळाच्या बैठकीत संचलन तुटीबाबत निर्णय घेण्यात येईल.
             – ओम प्रकाश बकोरिया, व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

Back to top button