सायबर तक्रारींचा ढीग ! मनुष्यबळाचा अभाव ; तीन हजारांपेक्षाही अधिक तक्रार अर्ज | पुढारी

सायबर तक्रारींचा ढीग ! मनुष्यबळाचा अभाव ; तीन हजारांपेक्षाही अधिक तक्रार अर्ज

अशोक मोराळे : 

पुणे : शहरातील विविध पोलिस ठाण्यांत सायबर तक्रारींचा अक्षरश: ढीग तयार झाला आहे. मार्च 2023 अखेर तब्बल तीन हजारांपेक्षा अधिक तक्रार अर्ज आले आहेत. मात्र, तुलनेत गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अल्प असल्याचे दिसून आले आहे. पोलिस ठाण्यातील उपलब्ध मनुष्यबळ व तांत्रिक सोई-सुविधांचा अडसर हे यामागचे मूळ कारण आहे.

पूर्वी सायबर गुन्ह्यांच्या संदर्भातील तक्रारी शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात दाखल करून घेतल्या जात होत्या. त्यानंतर त्या तक्रार अर्जाची चौकशी केल्यानंतर तक्रारींचे गांभीर्य पाहून तांत्रिक मदत देऊन एकतर सायबर पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल केले जात होते किंवा संबंधित पोलिस ठाण्याकडे ते पाठविले जात होते. सप्टेंबर 2022 पासून स्थानिक पोलिस ठाण्यात सायबर गुन्ह्यांच्या संदर्भातील तक्रारी घेण्याचे आदेश तत्कालीन पोलिस आयुक्तांनी दिले.

सायबर पोलिस ठाण्याची पुनर्रचना करण्यात आली. त्याचबरोबर पोलिस ठाण्यातसुद्धा एक पोलिस अधिकारी (पीएसआय, एपीआय) व दोन कर्मचारी मदतीसाठी असे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले. मात्र, पोलिस ठाण्यात उपलब्ध मनुष्यबळ, बंदोबस्त व त्या अधिकार्‍याला कराव्या लागणार्‍या डे ऑफिसर कर्तव्यासह इतर तपास त्यामुळे सायबर तक्रारींच्या कामाला हवा तेवढा वेळ देता येत नाही. सायबर गुन्हा घडल्यापासून त्याचा तपास करण्यासाठी काही ‘गोल्डन अवर्स’ महत्त्वाचा असतो. तांत्रिक मदत घ्यावी लागते. मात्र, पोलिस ठाण्यात बहुदा या गोष्टी तत्काळ शक्य होत नाहीत. 3

त्यामुळे पुढील तपासात अनेक अडचणी निर्माण होतात. शिवाय पोलिस ठाण्याकडील सायबर तपास पथकाला आवश्यक असलेल्या प्रशिक्षणाचा अभाव देखील या ठिकाणी दिसून येतो. त्याची दुसरी बाजू सायबर पोलिस ठाण्यात तपासासाठी लागणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान असते. तसेच, विविध कंपन्यांच्या सिस्टिमचा अ‍ॅक्सेस त्यांना तत्काळ मिळतो. जेणेकरून आरोपीपर्यंत पोहचण्याबरोबरच त्याने चोरी केलेले पैसे खात्यात गोठविता येतात.

प्रत्येक झोनला सायबर ठाण्याची गरज
गतवर्षी (2022) पुण्यात सायबर व स्थानिक पोलिस ठाण्यात मिळून तब्बल 24 हजार 434 सायबर गुन्ह्याच्या संदर्भातील तक्रार अर्ज आले आहेत. तर, 432 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील पोलिस ठाण्यात 394 व सायबरकडे 38 गुन्हे दाखल आहेत. एकंदर हे चित्र पाहता भविष्यात प्रत्येक परिमंडळ येथे एक स्वतंत्र सायबर पोलिस ठाण्याची गरज भासू शकते.

तीन महिन्यांत 32 गुन्हे दाखल
सायबर तक्रारींच्या संदर्भातील पहिल्या तीन महिन्यांत 32 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सायबर पोलिस ठाण्यात 32, तर विविध स्थानिक पोलिस ठाण्यांत 32. त्याचबरोबर सायबर पोलिस ठाण्याकडे येणार्‍या तक्रारींची संख्यादेखील मोठी आहे.

Back to top button