पिंपरी-चिंचवड पोलिसांना केंद्राचे पदक मिळणार? सहा अतिउत्कृष्ट तपासाचे प्रस्ताव तयार | पुढारी

पिंपरी-चिंचवड पोलिसांना केंद्राचे पदक मिळणार? सहा अतिउत्कृष्ट तपासाचे प्रस्ताव तयार

पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: गुन्ह्याच्या तपासामध्ये अतिउत्कृष्ट प्रावीण्य दाखविणार्‍या पोलिसांना ‘केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक’ प्रदान करण्याचे नियोजित आहे. याकरिता केंद्रीय गृहमंत्रालयाकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. त्यानुसार, पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून सहा गुन्ह्यांमध्ये झालेल्या उत्कृष्ट तपासाचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. राज्यभरातून मोठ्या संख्येत प्रस्ताव सादर करण्याचे काम सुरू आहे. मात्र, महाराष्ट्र राज्यासाठी केवळ 11 पदके देण्यात येणार आहेत. त्यामुळे पिंपरी- चिंचवड पोलिस या स्पर्धेत टिकणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महाराष्ट्रासाठी 11 पदके

केंद्रीय तपास यंत्रणा, राज्य व केंद्रशासीत प्रदेशातील तपास यंत्रणा यांना एकूण 162 पदके देण्यात येणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्यासाठी एकूण 11 पदके आहेत. यातील 3 पदके महिलांकरिता आहेत. त्यामुळे या पदकाचे विशेष महत्व राहणार आहे.

पदकासाठी हे आहेत निकष

गुन्ह्याचा तपास करताना तपासी अंमलदार किंवा अधिकार्‍याने कल्पकतेने तपास करणे, तपासामध्ये शास्त्रोक्त व न्यायसहाय्यक वैज्ञानिक साधनांचा वापर करणे अपेक्षित आहे. तसेच, ऑनलाईन इन्व्हेस्टिगेशन टुल्सचा, मुदतीत दोषारोपपत्र पाठविणे, मिडीया कव्हरेज, आरोपीला शिक्षा होणे, कोर्ट अप्रिसिएशन आदी मुद्दे विचारात घेतले जाणार आहेत.

घटक प्रमुखांची जबाबदारी

पदकासाठी शिफारस पाठवण्याची सर्वस्वी जबाबदारी घटक प्रमुखांची असणार आहे. प्रत्येक मुद्यांचा समावेश करून व्याकरणाच्या चुका टाळून संक्षिप्त स्वरुपात (200 शब्दांत) प्रस्ताव पाठवण्याबाबत गृह मंत्रालयाकडून आदेशीत करण्यात आले आहे. घटकप्रमुख यांनी स्वतः नमूद प्रस्तावांची पडताळणी करून प्रस्ताव पाठवावे, असेही आदेशात नमूद आहे.

निवड समितीसमोर करावे लागणार सादरीकरण

तपासी अधिकारी / अंमलदार यांनी सर्वोत्कृष्ट तपास केलेल्या गुन्ह्याबाबत माहितीचे सादरीकरण निवड समितीसमोर व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे स्वतः करावयाचे आहे. याबाबतची घटक प्रमुखांना लिंक पाठविण्यात येणार आहे.

हवालदार ते अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांना पदक

‘केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक’ हे पोलिस हवालदार ते पोलिस अधीक्षक दर्जाच्या तपासी अधिकार्‍यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी घटक प्रमुखांनी आपल्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी व अंमलदार यांना याबाबत माहिती दिली आहे.

गुन्ह्यांचा उत्कृष्ट तपास झालेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदकासाठी एकूण सहाजणांचे प्रस्ताव पाठवण्याची कार्यवाही सुरू आहे.
– स्वप्ना गोरे, पोलिस उपायुक्त, प्रशासन

Back to top button