ओसाड गावच्या पाटीलकीसाठी उमेदवारांनी बांधलाय चंग ! महाविकास आघाडी-सर्वपक्षीय पॅनेलमध्ये रंगलाय सामना | पुढारी

ओसाड गावच्या पाटीलकीसाठी उमेदवारांनी बांधलाय चंग ! महाविकास आघाडी-सर्वपक्षीय पॅनेलमध्ये रंगलाय सामना

गणेश विनोदे

वडगाव मावळ (पुणे ): मावळ तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती या ओसाड गावची पाटीलकी मिळवण्यासाठी सर्वच उमेदवारांनी चंग बांधला असल्याचे सध्या सुरू असलेल्या प्रचार यंत्रणेवरून दिसते आहे. दरम्यान, निवडणुकीत कोण बाजी मारणार व ही पाटीलकी कोणाच्या पदरात पडणार, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.

इच्छुकांची संख्या वाढली

साधारणतः काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या बाजार समितीची निवडणूक यापूर्वी 12 वर्षांपूर्वी झाली होती. तत्कालीन संचालक मंडळाच्या कार्यकाल संपून सहा वर्षे होऊन गेले. त्यामुळे इतक्या विलंबानंतर होत असलेल्या या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले व इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.

चार अपक्ष रिंगणात

दरम्यान, अर्ज दाखल केलेल्या अनेक इच्छुकांना माघार घेण्यास सर्वच पक्षांच्या श्रेष्ठींना यश आले व 18 जागांसाठी महाविकास आघाडी पुरस्कृत सहकार पॅनेलचे 18 तर भाजप व मित्रपक्ष पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज सर्वपक्षीय सहकार परिवर्तन पॅनेलचे 18 उमेदवार अशी दोन पॅनेलमध्ये सरळ लढत रंगली आहे. तर अपक्ष उमेदवार म्हणून नवनाथ हरपुडे, सुनील दाभाडे, जितेंद्र परदेशी व परशुराम मालपोटे हे चार जण रिंगणात आहेत.

काँग्रेसच्या नेते दोन्ही पॅनेलमध्ये

महाविकास आघाडीच्या पॅनेलमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व इतर मित्रपक्ष तर छत्रपती शिवाजी महाराज सर्वपक्षीय पॅनेलमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट), रिपब्लिकन पार्टी व इतर मित्रपक्षांचा सहभाग आहे. दरम्यान, दोन्ही पॅनलमध्ये काँग्रेसची भूमिका मात्र चर्चेची ठरली आहे. या दोन्ही पॅनेलमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांचा समावेश असून पक्षाचे नेतेही दोन्ही पॅनेलमध्ये विभागले गेले आहेत.

मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या श्री पोटोबा महाराजांच्या मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून दोन्ही पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या धडाक्यात करण्यात आला आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन्ही पॅनेलचा जोरदार प्रचार सुरू असल्याचे दिसते.

6 एकर जागा, पण मोडकळीस आलेले कार्यालय

वास्तविक ज्या खुर्चीसाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे, त्या खुर्चीसाठीच अपेक्षित जागा नाही, अशी बाजार समितीची अवस्था आहे. तळेगाव स्टेशन येथील हरणेश्वर टेकडीच्या पायथ्याला बाजार समितीची सुमारे सहा एकर जागा आहे. परंतु, रस्त्याची अडचण असल्यामुळे ही जागा विकसित करण्यास अडचणी येतात. त्यामुळे आतापर्यंत विकसन होऊ शकलेले नाही. याठिकाणी समितीचे कार्यालय आहे. परंतु, कार्यालय असलेली वास्तू मोडकळीस आलेली आहे. समितीकडे फक्त सुमारे दीडशेच्या आसपास व्यापार्‍यांची नोंदणी असून सचिव म्हणून मंगेश घारे व शिपाई म्हणून ज्ञानेश्वर आडकर हे दोनच कामगार काम पाहत आहेत.

व्यापारी गटात रंगत !

केवळ 2 जागा व 108 मतदार असलेल्या व्यापारी गटात उमेदवार मात्र 6 आहेत. यामध्ये महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलमध्ये महेंद्र ओसवाल व भरत टकले तर सर्वपक्षीय सहकार पॅनेलमध्ये प्रकाश देशमुख व नामदेव कोंडे हे रिंगणात आहेत. याशिवाय अपक्ष उमेदवार नवनाथ हरपुडे व परशुराम मालपोटे यांनीही प्रचारावर जोर दिल्याने व्यापारी गटातील दोन जागांसाठी रंगत होणार आहे.

Back to top button