

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मिळकतकरात मिळणारी 40 टक्के सवलत शासनाने कायम ठेवल्यानंतर 1 मे पासून कराची बिले देण्याचे महापालिकेने यापूर्वी जाहीर केले होते. मात्र, यात आता बदल करण्यात आला आहे. ही बिले 15 मेपासून ऑनलाइन पाठवली जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
राज्य शासनाने पुणेकरांची 40 टक्के कर सवलत कायम ठेवली आहे. शिवाय, थकबाकीसह देखभाल दुरुस्तीसाठी देण्यात येणारी 15 टक्के सवलत 10 टक्के केली आहे. त्यामुळे महापालिकेस तब्बल साडेबारा लाख मिळकतकराची बिले नव्याने तयार करावी लागणार आहेत. पहिल्या टप्प्यात ऑनलाइन बिले पाठविण्यात येणार असून, त्यानंतर छापील बिले पोस्टाद्वारे पाठविण्यात येणार आहेत. बिल तयार करण्यासाठी 20 ते 25 दिवसांचा कालावधी लागणार आहे.
महापालिका मिळकतकर वाजवी भाडे मूल्यावर आकारते. शहराच्या प्रत्येक भागाचे दर वेगवेगळे आहेत. त्यामुळे सर्वच तपशील पालिकेस बदलावे लागणार आहेत. शिवाय 2019 पासून 40 टक्के सवलत रद्द केलेल्या सुमारे 1 लाख 67 हजार मिळकती आहेत. 97 हजार मिळकतींना ही सवलत रद्द करून 40 टक्के थकबाकी लावण्यात आली आहे. या बिलांमध्ये बदल करावे लागणार आहेत. शासनाकडून हा निर्णय 31 मार्चअखेर घेतला जाईल, असा महापालिकेचा अंदाज असल्याने पालिकेने आधी 1 मे रोजी बिले देणार असल्याचे जाहीर केले होते. पण, प्रत्यक्षात शासनाला निर्णय घेण्यास एप्रिलचे पहिले दोन आठवडे गेल्याने बिलांचे नियोजन बदलावे लागले आहे.
15 जुलैपर्यंतच मिळणार सवलत
पुणेकरांनी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच मिळकतकर भरावा, यासाठी दि. 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीत मिळकतकर भरणार्यांना सर्वसाधारण करात 5 ते 10 टक्के सवलत दिली जाते. ही सवलत दोन महिने देण्यात येते. मात्र, यंदा नागरिकांना बिलच उशिरा दिले जाणार असल्याने आता ही सवलत 15 मे ते 15 जुलैपर्यंत देण्याबाबत प्रस्तावात म्हटले आहे. या दोन महिन्यांतच एकूण मिळकतकर उत्पन्नाच्या जवळपास 50 टक्के उत्पन्न पालिकेच्या तिजोरीत जमा होते.