विमानांना अतिबाष्पयुक्त ढगांचा धोका ! हवामान विभागाचा विमानतळांना इशारा | पुढारी

विमानांना अतिबाष्पयुक्त ढगांचा धोका ! हवामान विभागाचा विमानतळांना इशारा

आशिष देशमुख : 

पुणे : सध्या पडत असलेले कडक ऊन आणि सतत पडणारा पाऊस, यामुळे उंच आकाशात क्युम्युनोलिंबस ढगांची (जास्त बाष्प असणारे ढग) निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र, त्याचा आकाशातून जाणार्‍या विमानांना धोका आहे, असे अलर्ट सतत हवामान विभाग विमानतळ यंत्रणेला देत आहे.

ढगांची निर्मिती पावसाळ्यात वेगाने होते. कारण, कडक ऊन आणि आर्द्रता या दोघांच्या संगमातून क्युम्युनोलिंबस ढगांची निर्मिती होते. मात्र, यंदा प्रथमच मार्च, एप्रिलमध्ये या ढगांची निर्मिती अतिशय वेगाने होते आहे. त्यामुळे आकाशातून प्रवास करताना हे भले मोठे ढग विमानांना मोठा धोका पोहचवू शकतात. याबाबत पायलटना या ढगांच्या जवळूनसुध्दा विमाने नेऊ नका. अशा प्रकारच्या सूचना व सतत अलर्ट दिले जात आहे.

क्युम्युनोलिंबस ढग म्हणजे काय..?
उंच आकाशात कापसासारखे पांढरे शुभ्र ढग दिसतात. त्यांची लांबी आणि उंची खूप मोठी असते. क्रिकेटच्या मैदानाएवढे विस्तीर्ण तसेच 12 ते 15 किलोमीटर उंची असते. या ढगांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बाष्प तर असतेच; शिवाय विद्युतभारही असतो. धन व ऋण हे दोन्हीही भार त्यात असल्याने विमान त्यातून अथवा जवळून गेले तरी सर्व यंत्रणा बंद पडू शकते.

कसे तयार होतात हे ढग…?
बंगालच्या उपसागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे व अरबी समुद्राकडून येणार्‍या दमट वार्‍यांची टक्कर झाली की ही दोन्ही वारे उंचावर जातात व खूप मोठ्या प्रमाणावर बाष्प असणार्‍या ढगांची निर्मिती होते. आकाराने फुलकोबीसारखेच दिसणारे हे ढग चमकणारे व गर्जना असात, त्यांना क्युम्युनोलिंबस हे हवामानाच्या भाषेत म्हणतात. हा लॅटीन शब्द आहे.

जे काळेभोर ढग दिसतात ते साधे असतात. त्यामुळे फक्त पाऊस पडतो. मात्र, क्युम्युनोलिंबस ढग हे पांढरे शुभ— चमकणारे असतात. यात इलेक्ट्रो मॅग्नेटिक लहरी असल्याने त्यातून विजांचा कडकडाट निर्माण होतो. त्यामुळे या ढगांचा विमानांना धोका असतो. त्यामुळे हे अलर्ट विमानांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. सध्या या ढगांचे प्रमाण वाढल्याने हे अलर्ट दिले जात आहेत.
               – डॉ. के. एस. होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, पुणे हवामान विभाग

Back to top button