पुण्यातील चांदणी चौकातील पुलाचा मुहूर्त टळणार | पुढारी

पुण्यातील चांदणी चौकातील पुलाचा मुहूर्त टळणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे आणि रस्त्याचे उद्घाटन महाराष्ट्रदिनी (1 मे) होईल, अशी घोषणा केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. परंतु, हा मुहूर्त टळणार, असे वृत्त दै. ‘पुढारी’ने प्रसिद्ध केले होते. त्यावर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) शिक्कामोर्बत करण्यात आले असून, 20 दिवसांमध्ये काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे एनएचएआय कडून सांगण्यात आले. एनडीए चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

त्यात उड्डाणपुलासह सेवा रस्त्यांचे काम काम सुरू आहे. उड्डाणपुलाचे खांब उभे करण्यात आले असून, त्यावर टाकल्या जाणार्‍या गर्डरपैकी काही गर्डरचे काँक्रिटीकरण निर्धारित वेळेत झाले नाही. त्यासाठी लागणारी आवश्यक साधने, इतर संसाधनेे वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे कामात व्यत्यय निर्माण झाला. आता ही संसाधने उपलब्ध झाली असल्याने उर्वरित गर्डरचे काँक्रिटीकरण सुरू असल्याची माहिती एनएचएआय कडून देण्यात आली. चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे आणि तेथील रस्त्यांचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. त्यानुसार गर्डर टाकण्यापूर्वी या मार्गावरील वाहतुकीसंदर्भात दोन-दोन तास वाहतूक बंद करण्याचे नियोजन केले जात आहे. त्या वेळी पर्यायी रस्त्यांचे नियोजन करण्यात येत असून, मुळशीकडे जाणार्‍या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे.

दरम्यान, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मार्गावरील वाहतूक वळविण्यासाठी वाहतूक विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. येत्या आठवडाभरात बैठक आयोजित करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे एनएचएआयकडून स्पष्ट करण्यात आले.
केंद्रीय वाहतूकमंत्री गडकरी यांचा 1 मे रोजी उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्याचा मानस फोल ठरला असून, पुणेकरांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 

 

Back to top button