पुणे शहरात पाणीकपात होणार का? कालवा सल्लागार समितीची आज बैठक | पुढारी

पुणे शहरात पाणीकपात होणार का? कालवा सल्लागार समितीची आज बैठक

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  अल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सुनवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर  बुधवारी (दि.26) कालवा समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत धरण साखळीतील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता शहराला पाणीकपात लागू करायची की ’जैसे थे’ पाणीपुरवठा ठेवायचा या संबंधीचा निर्णय होणार आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार अल निनोमुळे मान्सुनवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्याचे आदेश शासनाने महापालिका तसेच पाटबंधारे विभागास दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने 15 जुलैऐवजी यंदा 31 ऑगस्टपर्यंतच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे.

त्यानुसार पालिकेने पाटबंधारे विभागाने 7.97 टीएमसी पाणीसाठा आरक्षित करण्याची मागणी दोन आठवड्यांपूर्वी केली आहे. सद्यस्थितीला चारही धरणांमध्ये 11.76 अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे 40.33 टक्के इतका पाणीसाठा आहे. उन्हाळी आवर्तनासाठी साडेचार ते पाच टीएमसी पाण्याची गरज आहे. याशिवाय बाष्पीभवन लक्षात घेता एकूण मागणी आणि पुरवठा यात तफावत राहत आहे. शेतीला पाणी सोडल्यास महापालिकेने केलेल्या मागणीनुसार पाणीपुरवठा आरक्षित ठेवता येणार नाही. त्यामुळे कालवा समितीच्या बैठकीत शहराच्या पाण्याला कात्री लावणार की शेतीच्या पाण्याला हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आठवड्यातून एक दिवस कपात?
महापालिकेने ऑगस्ट अखेरपर्यंत 8 टीएमसी पाण्याची मागणी केली होती. त्यास पाटबंधारे विभागाने नकार दिला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याची तयारी केली आहे. त्यानुसार येत्या गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला. मात्र, पुढील महिनाभर एक दिवस पाणी बंद ठेवले तरी फक्त अर्धाच टीएमसी पाणी वाचणार आहे. त्यामुळे आता कालवा समितीच्या बैठकीतच काय जो निर्णय होईल त्यानुसार कार्यवाही करण्याची तयारी पालिका प्रशासनाने ठेवली आहे.

शहरात पाणीगळतीची 13 ठिकाणे-
पाणीगळती शोधण्यासाठी महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर ’अकॉस्टिक सेन्सर’ या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने वडगाव जलकेंद्रापासून कात्रज येथील केदारेश्वर पाण्याच्या टाकीपर्यंतच्या मुख्य वाहिनीवर 13 ठिकाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Back to top button