जुन्नर बाजार समितीचा सोशल मीडियावर धुरळा; राजकीय वातावरण तापले | पुढारी

जुन्नर बाजार समितीचा सोशल मीडियावर धुरळा; राजकीय वातावरण तापले

ओतूर; पुढारी वृत्तसेवा : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे पडघम जोरदार वाजायला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर होणार्‍या शाब्दिक चकमकीतून “हम भी कुछ कम नही”चा अनुभव येऊ लागला आहे. दरम्यान, तालुक्यातील जवळजवळ सर्वच राजकीय पक्ष व नेत्यांनी या निवडणुकीत सहभाग नोंदवून दमदार प्रचाराला सुरुवात केली आहे.

ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात असून, भविष्यात येऊ घातलेल्या निवडणुकांची नांदी ठरणार यात शंकाच नाही. प्रस्थापितांना ही निवडणूक अगदीच अलगद जाईल असेही नक्कीच नसले, तरी अनुभवातून ते मार्ग काढतील, अशी चर्चा परिसरात होत आहे. तालुक्यात आघाडीत बिघाडी झाल्याचे एकंदरीत दिसून येते. यामुळे नेतेदेखील काहीसे विचाराधीन झालेत. राजकीय समीकरणे आणि त्यावर वेगवेगळे फंडे व क्लृप्त्या वापरण्याचा चंग बांधला जात आहे.

सहकार महर्षी स्व. शिवाजीराव काळे यांचे चिरंजीव बाजार समितीचे विद्यमान सभापती अ‍ॅड. संजय काळे यांच्या सोबत तालुक्याचे आमदार अतुल बेनके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर तसेच बाजार समितीचे अनेक आजी-माजी संचालक, मतदारवर्ग त्यांच्यासोबत या निवडणुकीत सहभागी झालेले दिसत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत शिवसेनेचे नेते प्रत्यक्षपणे दिसत नाहीत. सहकारातील या मोठ्या अग्रगण्य संस्थेच्या निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी अ‍ॅड. संजय काळे यांना बर्‍यापैकी मेहनत घ्यावी लागणार असली, तरी राजकीय वर्तुळातून निर्णायक बात बोलली जात आहे.

दुसरीकडे बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषदेच्या माजी गटनेत्या आशा बुचके, भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष व बाजार समितीचे माजी संचालक भगवान घोलप, शेतकरी संघटनेचे राजेंद्र ढोमसे व अशी दिग्गज मंडळीनी आपली ताकद दाखवत शड्डू ठोकायला सुरुवात केली आहे. निवडणूक रिंगणात उतरलेले सर्वचजण तुल्यबळ आहेत. परिणामी, प्रस्थपितांना ही निवडणूक तितकीशी सोपी राहिली नाही, असे सध्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

गावनेतेदेखील उतरले रणांगणात

आघाडीत झालेली बिघाडी, स्वपक्षीय विरोधक, अपक्ष उमेदवार या सर्व कारणाने बाजार समितीची निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. 18 जागांसाठी एकूण 41 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये कोणाची सरशी लागते हे सर्व मतदारांच्या कौलावर अवलंबून आहे. मात्र, या निवडणुकीत तालुक्यासह आता गावनेतेदेखील उतरले असून, आता ही लगबग आणि चर्चा तालुक्यातील कट्ट्याकट्ट्यांवर रंगायला लागली आहे.

Back to top button