निरा-बारामती मार्गावरील सदोष गतिरोधक झाले घातक | पुढारी

निरा-बारामती मार्गावरील सदोष गतिरोधक झाले घातक

बारामती; पुढारी वृत्तसेवा : निरा-बारामती राज्यमार्गावर वडगाव निंबाळकर व ठिकठिकाणी रस्तादुरुस्ती व डांबरीकरण केले आहे. मात्र, रस्त्यावर टाकलेले गतिरोधक अपघातांना निमंत्रण देत आहेत. गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्याची मागणी होत आहे. नियमानुसार न बनवलेल्या गतिरोधकांमुळे प्रवाशांचे मणके ढिले होत आहेत. रस्ता चांगला झाल्याने वाहनचालक वेगाने वाहने चालवत आहेत.

मात्र, गतिरोधकाचा अंदाज येत नसल्याने अपघात घडत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ढोलेवस्ती ते वडगाव पोलिस ठाण्यापर्यंत रस्ता करण्यात आला. गर्दीच्या ठिकाणी गतिरोधक टाकले. मात्र, त्यावर पांढरे पट्टे नसल्याने अपघातात वाढ झाली आहे. निरा- बारामती या मार्गावर वाहतुकीचा सर्वाधिक ताण आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील पुलांची कामे दर्जेदार केल्याने वाहनचालक समाधानी आहेत. ठिकठिकाणीचा रस्ताही दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. सर्वाधिक गतिरोधकही याच मार्गावर आहेत. रहदारीची ठिकाणे, शाळा-महाविद्यालये या ठिकाणी गतिरोधक असणे गरजेचे आहे. मात्र, त्याची उंची कमी असावी आणि ते नियमानुसार असावेत, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.

गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारा

वडगाव निंबाळकर येथे टाकलेल्या गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्याची मागणी जय मल्हार क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब मदने यांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देणार असल्याचे मदने यांनी सांगितले.

Back to top button