कामशेत : यात्रा, जत्रामुळे गावचे गावपण टिकून | पुढारी

कामशेत : यात्रा, जत्रामुळे गावचे गावपण टिकून

कामशेत : मावळ तालुक्यात गावोगावी अजूनही यात्रा-जत्रा मोठ्या उत्साहाने भरत आहेत. यामध्ये गावातील ग्रामदैवताची तिथीप्रमाणे सर्व कार्यक्रम आयोजित केले जातात. यामधून गावचे गावपण अजूनही टिकून असल्याचे दिसत आहे.

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

जत्रेसाठी उत्सव कमिटी तयार केली जाते. त्यामध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच इतरपदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाचे आयोजन व नियोजन करण्यात येते. काही गावांत दोन-तीन दिवस आगोदर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्या वेळी भजन, प्रवचन, कीर्तन, जागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

जत्रेच्या पहिल्या दिवशी ग्रामदैवतेचा अभिषेक, पूजा, पारंपरिक धार्मिक विधी, ग्रामदैवतेची वाजतगाजत पालखीतून मिरवणूक किंवा नगरप्रदिक्षणा छबिना, मनाची काठी इत्यादी कार्यक्रमांसाठी ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. संध्याकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम यामध्ये गावोगावची भारुडे, गाण्याचा कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

घरोघरी पै-पाहुणे

गावातील प्रत्येक घरी नातेवाईक, पै-पाहुणे, मित्र परिवार यांना आग्रहाचे निमंत्रण दिले जाते. त्यासाठी शाकाहारी आणि मांसाहारी जेवण करून पाहुण्यांचा आदर सत्कार करण्यात येतो. पुन्हा दुसर्‍या दिवशी काही गावात मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.
जत्रेमुळे गावातील आर्थिक चक्रालाही चालना मिळत आहे. यामुळे अनेकांना रोजगार मिळत असल्याचे दिसत आहे. जत्रेमुळे गावाचे गावपण टिकून आहे. महागाई आणि धकाधकीच्या जीवनात गावागावातील जत्रायामुळे अजून ही पारंपरिक पद्धती टिकून असल्याचे दिसत आहे. यामुळे दरवर्षी गावात भरणारी जत्रा गावकर्‍यांसाठी उत्सवाचे वातावरण निर्माण करणारी एक ऊर्जा असते.

कुस्त्यांच्या आखाड्याला सर्वांधिक पसंती

दुसर्‍या दिवशी भारूडाच्या हजेरीचा कार्यक्रम, संध्याकाळी कुस्त्यांचा आखाडा रंगतो. यात लहानापासून मोठ्या पैलवानांच्या कुस्त्या रंगतदार होतात. या कुस्त्या खेळण्यासाठी लांबून लांबून पैलवान येत असतात. या पैलवानांना रोख रक्कम, चषक, गदा बक्षीस म्हणून देण्यात येतात. या कुस्त्या पाहण्यासाठी शौकीन गर्दी करतात.

Back to top button