पिंपरी : दोन महिन्यांतच पालिकेतील नव्या स्वच्छतागृहाची दुरवस्था | पुढारी

पिंपरी : दोन महिन्यांतच पालिकेतील नव्या स्वच्छतागृहाची दुरवस्था

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात दोन महिन्यांपूर्वी तळमजल्यावरील स्वच्छतागृहाचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र, तेथील साहित्य एक एक करून तुटत असल्याचे काम दुय्यम दर्जाचे असल्याचे दिसून येत आहे. सुमार दर्जाच्या कामामुळे पालिकेचे लाखो रपये पाण्यात गेल्याचे स्पष्ट होत आहे.

चार मजली पालिका भवनाच्या इमारतीमध्ये पुरूष, महिला व तृतीयपंथी असे वेगवेगळे स्वतंत्र स्वच्छतागृह प्रत्येक मजल्यावर आहेत. अधिकारी, कर्मचारी तसेच, कामानिमित्त येणारे शेकडो नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक व पदाधिकारी, ठेकेदारांचे प्रतिनिधी आदी त्यांचा वापर करतात. पालिकेत दररोज शेकडो नागरिक ये-जा करतात. त्यामुळे सर्वच स्वच्छतागृहात गर्दी असते.
चौथ्या मजल्यावरील स्वच्छतागृहाच्या नूतनीकरणानंतर तळमजल्यावरील स्वच्छतागृहाचे दोन महिन्यांपूर्वी काम करण्यात आले.

पंचतारांकित हॉटेलप्रमाणे तेथील स्वच्छतागृह बनविण्यात आले. मात्र, हे चकचकीत काम दुय्यम दर्जाचे असल्याचे आता स्पष्ट होत आहे. पूर्वी लघवी करण्यासाठी उंच ओटा नव्हता. तो नंतर तयार करण्यात आला. त्यामुळे तेथील भांडे खाली गेले आहेत. तसेच, दोन व्यक्तीमध्ये लावलेले पार्टीशन तुटले आहेत. तुटलेले पार्टीशन स्क्रूने जोडण्यात आले आहेत. ती किती दिवस तग धरेल, हे सांगता येत नाही.

पहिल्या व दुसर्‍या मजल्यावर स्वच्छतागृहाचीही दुरूस्ती करण्यात आली. तेथे थेट नव्याने नळजोड देण्यात आले आहेत. पाणीविरहीत स्वच्छतागृहाची व्यवस्था प्रणाली पालिकेने अंगीकारली आहे; मात्र तरीही याठिकाणी नळजोड देण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्याची नासाडी होत आहे. तसेच, नूतनीकरण केल्यानंतर चौथ्या मजल्यावरील स्वच्छतागृहातील फरश्या व टॉइल्स तुटल्या आहेत.

Back to top button