पुणे : लॉ सीईटी-फार्मसीच्या परीक्षा एकाच दिवशी | पुढारी

पुणे : लॉ सीईटी-फार्मसीच्या परीक्षा एकाच दिवशी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने विधी 3 वर्षे पदवी या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशा साठी घेण्यात येणारी सीईटी 2 आणि 3 मे रोजी होणार आहे. याच दिवशी मुंबई विद्यापीठाकडून बी फार्मसी अभ्यासक्रमांची आठव्या सत्रातील परीक्षा 2 मे रोजी सकाळी 10:30 ते 1:30 या वेळेत होणार आहे. या परीक्षा एकाच वेळी असल्याने विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे या परीक्षा तारखा बदलाव्या, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे.

राज्य सामाईक कक्षामार्फत 2 मे रोजी घेण्यात येत असलेल्या विधी तीन वर्षे पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी 22 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. याच दिवशी मुंबई विद्यापीठाकडून बी.फार्मसीच्या आठव्या सत्रातील ’बायोस्टॅस्टिक्स रिसर्च मेथड’ या विषयाचा पेपरही सकाळी 10:30 ते 1:30 या कालाधीत होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाने 18 एप्रिल रोजी जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्राचेही वाटप केले आहे. पेपर एकाच दिवशी असल्याने या विद्यार्थ्यांसमोर अडचणी आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यास क्रमाच्या परीक्षाही सुरू आहेत. मुंबई विद्यापीठामधील या ना त्या कारणाने परीक्षा विभागाचा गोंधळ सुरूच आहे. आता सीईटीच्या परीक्षेवेळी या परीक्षेचे आयोजन केले आहे. एकाच दिवशी दोन पेपर असल्याने विद्या र्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबई विद्यापीठ आणि सीईटी सेलने समन्वय साधत कोणता तरी एक पेपर पुढील तारखेस घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अमोल मातेले यांनी केली आहे.

Back to top button