पुणे; पुढारी वृत्तसेवा : नदीपात्र व वेताळ टेकडी परिसरात सुरू असलेली वृक्षतोड या दोन्ही घटनांचा निषेध करीत शहरातील पर्यावरणप्रेमींनी महापालिकेने दिलेला पर्यावरणदूत सन्मान महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या दालनात जाऊन परत केला. मात्र, या वेळी आयुक्तांनी त्यांची भेट नाकारली, त्यामुळे त्या सर्वांनी आयुक्तांच्या दालनाजवळ निषेध नोंदवला.
शहरातील पर्यावरणप्रेमी रणजित गाडगीळ, केतकी घाटे, राजीव पंडित, सत्या नारायण, डॉ. गुरुदास नूलकर, शैलजा देशपांडे, अनंत घरत,अमिताभ मलिक, वैशाली पाटकर, डॉ. प्रियदर्शनी कर्वे यांनी महापालिकेच्या दालनात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. या सर्वांना महापालिकेने 31 मार्च 2023 रोजी पर्यावरणप्रेमींनी पर्यावरणदूत सन्मान हा पुरस्कार दिला होता. आमचे म्हणणे अधिकारी ऐकत नाहीत. नदीपात्राचे सौंदर्यीकरण हे वृक्षतोड न करता होऊ शकते. मात्र, याबाबत पालिका आयुक्तांसह अधिकारी काही बोलण्यास तयार नाही. त्यामुळे हा पुरस्कार आम्ही परत करीत असल्याचे सांगितले.
राष्ट्रीय हरित न्यायाधीकरण, सर्वोच्च न्यायालयाने नदीकाठ सुधारणा प्रकल्पासंदर्भात दिलेल्या निर्णयानुसार पर्यावरण हानीची पाहणी करणे आवश्यक आहे. पर्यावरण मंत्रालयाकडून पुढील कामासाठी ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. तत्पूर्वीच या प्रकल्पाचे काम वेगाने पुढे नेले जात आहे, असा आरोपही या सर्वांनी पत्रकार परिषदेत केला.
पर्यावरणप्रेमींनी सांगितले की, 29 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी उद्यानाजवळून- चलो चिपको आंदोलन' काढण्यात येणार आहे.
पर्यावरणप्रेमी व जीवित नदीच्या प्रमुख शैलजा देशपांडे यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की, नदीपात्रात वृक्षतोड होणार असल्याचे वृत्त सर्वप्रथम 'पुढारी'ने दिले, त्यामुळे आम्हाला नदीपात्रात मोठी वृक्षतोड होत असल्याचे समजले. त्याबद्दल आम्ही 'पुढारी'चे आभार व्यक्त करतो.
पर्यावरणप्रेमींची पत्रकार परिषद महापालिकेच्या पत्रकार कक्षात सुरू होती. ती संपताच सर्वजण आयुक्तांच्या दालनाकडे पुरस्कार परत करण्यास गेले, तोच आयुक्त सुरक्षारक्षकांच्या गराड्यात घाईघाईने स्वतःच्या दालनातून बाहेर पडले. पर्यावरणप्रेमी पुरस्कार परत देण्यासाठी पुढे सरसावले तोच आयुक्त कठोर स्वरात त्यांना म्हणाले, माझी वेळ घेऊन या मग भेटतो. त्यामुळे पर्यावरणप्रेमी अधिकच दुखावले. त्यांनी आयुक्तांच्या दालनाकडे धाव घेतली. त्यांना सुरक्षारक्षक रोखत होते तरीही आयुक्तांच्या पाटीजवळ पुरस्कार उंचावत आपला निषेध नोंदवला व स्मृतिचिन्ह सुरक्षारक्षकांच्या स्वाधीन करत सर्वजण शांतपणे तेथून निघून गेले.