मैलापाणी थेट मुठा कालव्यात; नांदेड फाटा भागात दुर्गंधी | पुढारी

मैलापाणी थेट मुठा कालव्यात; नांदेड फाटा भागात दुर्गंधी

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : नांदेड फाट्याजवळील सिंहगड रस्त्यावर मुठा कालव्यावरील पुलाजवळ सांडपाण्याचे तळे साठले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गेल्या आठ, दहा दिवसांपासून हे मैलापाणी शेजारच्या मुठा कालव्यात मिसळत आहे.
मुख्य सिंहगड रस्त्यासह दळवीवाडी -धायरी रस्त्यावरील वाहतूक विस्कळित झाली आहे. सांडपाण्यातून ये-जा करताना पादचार्‍यांसह नागरिकांना कसरत करावी लागत आहे.

या परिसरात अंध महिला आश्रम, इंदुबाई दळवी शाळा, मारुती मंदिर तसेच नागरी वस्त्या आणि दुकाने आहेत. दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा निर्माण झाला आहे. काही दिवस जेमतेम सांडपाणी रस्त्यावरून वाहत होते. पाण्यामुळे डांबरीकरण वाहून जाऊन रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यात पाणी साठून लहान-मोठी तळी तयार झाली आहेत.

सिंहगड परिसर विकास समितीचे सचिव इंद्रजित दळवी म्हणाले की, चेंबरच्या झाकणातून मैलापाणी रस्त्यावर येत आहे. रस्त्यावर सांडपाणी साचून खड्डे पडले आहेत. खडकवासला मनसेचे अध्यक्ष विजय मते म्हणाले की, तक्रारी करूनही महापालिका उपाययोजना करत नाही. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. कालव्यात मैलापाणी मिसळू नये यासाठी उपाययोजना कराव्यात.

या भागातील सांडपाणी वाहिनी जीर्ण झाली आहे. यामुळे नवीन वाहिनी टाकण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.

                                                               -प्रदीप आव्हाड,
                                      सहायक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय.

 

Back to top button