पहिली जलजीवन योजना अर्धवट, तरीही दुसरीचा घाट ! सिंहगड परिसरातील प्रकार | पुढारी

पहिली जलजीवन योजना अर्धवट, तरीही दुसरीचा घाट ! सिंहगड परिसरातील प्रकार

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : जल योजनांच्या कामांतील भ्रष्टाचार थांबण्याचे नाव काही घेईना, अशी गंभीर स्थिती सिंहगड खोर्‍यातील खामगाव मावळ, मोगरवाडी येथे निर्माण झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून राबविलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम अर्धवट अवस्थेत असताना प्रशासनाने या भागासाठी कोट्यवधी रुपये खर्चाची दुसरी जलजीवन मिशन योजना राबवण्याचा घाट घातला आहे. या प्रकाराने आमदार भीमराव तापकीर आवक् झाले आहे.

अर्धवट पाणी योजनेबाबत गावात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी तातडीने बैठक घ्यावी, अशी सूचना तापकीर यांनी केली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार्‍या खामगाव मावळ, मोगरवाडी व वाड्या-वस्त्यांसाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने 2018 मध्ये राष्ट्रीय पेजल योजना मंजूर झाली. विहीर व इतर कामे अर्धवट असताना यंदा जानेवारी महिन्यात या योजनेचे पाणी कसेबसे मोगरवाडीत पोहोचले. अद्यापही विहीर बांधली नाही. दुसर्‍या पाणवठ्यावरून पाणी सुरू केले आहे. पाणी योजनेच्या खर्चाचा आराखडा मागूनही दिला नाही, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तापकीर यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांसह योजनेची पाहणी केली. त्या वेळी त्यांनी मंजूर निविदेप्रमाणे काम करावे, अशा सूचना दिल्या होत्या. असे असले तरी लोखंडीऐवजी प्लॉस्टिक जलवाहिका बसवून योजना राबविण्यात आली. थेट खडकवासला धरणावरून 12 किलोमीटर दूर अंतरावर पाणीपुरवठा होत असल्याने प्लॅस्टिकचे पाईपमधून गळती होत असून, ते उंदरेही कुरतडत आहेत. ही योजना अर्धवट असताना गेल्या 7 फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा योजना ताब्यात घ्यावी, असे पत्र ग्रामपंचायतीला दिले आहे. त्यातच आता नवीन पाणीयोजना राबविण्याचा घाट घालण्यात आला आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.

दुर्गम भागात पाण्यासाठी वणवण

खडकवासला धरणातून सिंहगडाच्या वाड्या वस्त्यांत गावात थेट पाणी आणण्यासाठी अडीच कोटी रुपयांचा खर्च केला आहे. या योजनेच्या आराखड्यातील दुरुपदरा, मोगरवाडी येथील जाणकर, कोकरे धनगरवस्त्या पाण्यापासून वंचितच आहेत. ऐन उन्हाळ्यात डोंगर चढउतार करत येथील रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम अर्धवट आहे. ते पूर्ण करण्याची सूचना पाणीपुरवठा विभागाला दिली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. पहिल्या योजनेचे काम पूर्ण करूनच नवीन योजना राबविण्यात यावी.

                                  – भीमराव तापकीर, आमदार

Back to top button