मंचर : बिबट्याच्या हल्ल्यात कोकरू मृत्युमुखी; मेंढपाळ किरकोळ जखमी | पुढारी

मंचर : बिबट्याच्या हल्ल्यात कोकरू मृत्युमुखी; मेंढपाळ किरकोळ जखमी

मंचर(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : रोडेवाडी फाटा टाकळकरवस्ती येथे शेतात वास्तव्यास असलेल्या मेंढीच्या कोकरावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. या वेळी मेंढपाळाने आरडाओरडा केला असता बिबट्याने त्याच्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये हातावर पंजा मारल्याने बिबट्याचे एक नख हाताला लागून मेंढपाळ किरकोळ जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. 24) पहाटे पाच वाजता घडली. रोडेवाडी फाटा टाकळकरवस्ती येथे शेतकरी अनिल जाधव यांच्या शेतात मेंढपाळ संतोष कचरू रुपनेर (वय 45, मूळ रा. गारकुलवाडी, कान्हूर मेसाई, ता. शिरूर) हे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मेंढ्यांसह राहत आहेत.

रविवारी रात्री नेहमीप्रमाणे मेंढ्या बांधून ते मेंढ्यांच्या बाजूला झोपले होते. रात्री 12 वाजेदरम्यान त्यांना काही अंतरावर बिबट्या दिसला. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या तेथून निघून गेला. पुन्हा पहाटे 5 वाजेच्या दरम्यान मेंढीने तीन दिवसांपूर्वी जन्म दिलेल्या कोकरावर बिबट्याने हल्ला केला. त्या वेळी बाहेर झोपलेले मेंढपाळ संतोष रुपनेर यांनी आरडाओरडा केला. बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत त्यांना पंजा मारला. बिबट्याचे एक नख त्यांच्या हाताला लागले.

दरम्यान, मेंढपाळ संतोष रुपनेर यांनी खासगी दवाखान्यात उपचार घेतले आहेत. सोमवारी सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान वन विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली आहे. या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असून, या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकरी चंद्रकांत सैद व इतर स्थानिक शेतकर्‍यांनी केली आहे.

Back to top button