पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बस उलटली; 12 प्रवासी जखमी | पुढारी

पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बस उलटली; 12 प्रवासी जखमी

खोर(ता. दौंड): भांडगाव येथे पुणे-सोलापूर महामार्गावर सोमवारी (दि. 24) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास भरधाव खासगी बस उलटली. यामध्ये 12 प्रवासी जखमी झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही.
मुंबईहून प्रवाशांना घेऊन ही बस सोलापूरच्या दिशेने जात होती. भांडगाव फाट्यावर हॉटेल झोपडीनजीक बस पलटी झाली. यामध्ये 12 प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये लहान मुलांचादेखील समावेश आहे. सुदैवाने जीवितहानी टळली. जखमींची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाहीत.

अपघाताची माहिती मिळताच यवतचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे सहकार्‍यांसमेवत तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच, यवत येथील श्री दत्त ट्रान्सपोर्टचे मालक संदीप दोरगे यांनी परिसरातील रुग्णवाहिका व क्रेनला घटनास्थळी पाचारण केले. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने जखमींना बसमधून बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त बस महामार्गावरून हटवून वाहतूक पूर्ववत केली.

Back to top button