पुणे : जादा परताव्याच्या आमिषाने पाऊण कोटींची फसवणूक | पुढारी

पुणे : जादा परताव्याच्या आमिषाने पाऊण कोटींची फसवणूक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कंपनीची गुंतवणुकीची कोणतीही स्कीम नसताना ट्रिनिटी कम्युनिकेशन कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून पाऊण कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमित कांबळे (वय 42, रा. आंबेगाव पठार) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आनंद विजय पाटोळे, संतोष रुडाल्फ आरलंड, सुष्मिता संतोष आरलंड- मिरजकर यांच्यावर फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थामधील हितसंबंधितचे संरक्षण (एमपीआयडी) अंतर्गत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आरलंड यांच्या ट्रिनिटी कम्युनिकेशन या कंपनीची कोणतीही गुंतवणुकीची पॉलिसी नाही. असे असताना फिर्यादी यांच्या ओळखीचे आनंद पाटोळे यांनी कंपनीची माहिती सांगून या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानुसार फिर्यादी यांनी 24 लाख रुपयांची गुंतवणूक डिसेंबर 2021 मध्ये केली. त्यापैकी 16 लाख 95 हजार रुपये परत न करता त्यांची फसवणूक केली. तसेच 43 लाख, 11 लाख व 4 लाख रुपयांची इतरांची फसवणूक केली असून, या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अंकुश कर्चे तपास करीत आहेत.

Back to top button