देश-विदेशातील पर्यटकांना पुण्यातील सांस्कृतिक पर्यटनाची भुरळ ! | पुढारी

देश-विदेशातील पर्यटकांना पुण्यातील सांस्कृतिक पर्यटनाची भुरळ !

सुवर्णा चव्हाण

पुणे : देशाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात सांस्कृतिक पर्यटनाला चालना मिळाली असून, देश-विदेशातील पर्यटक पुण्यातील कार्यक्रमांना, महोत्सवांना आणि नाट्य महोत्सवांना उपस्थिती लावत आहेत. पुण्यात येऊन नृत्य, संगीत, गायन, वादन, चित्रकला, शिल्पकला…अशा विविध कलांशी संबंधित देशभरातील कलाकार सादरीकरण करीत आहेत. जुन्या सांस्कृतिक संस्था, स्मारक, गायन-वादन-नृत्याशी संबंधित संस्थांना भेट देत आहे.

कोट्यवधींची उलाढाल

देश-विदेशातील पर्यटकांची वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थिती असून, अनेक कलाकारही पुण्यात येत आहेत. त्यामुळे एप्रिल ते जून या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये सांस्कृतिक पर्यटनाची कोट्यवधीची उलाढाल होत आहे. नाट्य महोत्सव, एकपात्री कार्यक्रम, साहित्य संमेलने, चित्रपट महोत्सव, सांगीतिक मैफली, चित्रकला प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन आदींना पर्यटकांची उपस्थिती मोठी असून, कोरोनानंतरच्या दोन वर्षांनंतर धार्मिक-सांस्कृतिक पर्यटनाची आर्थिक गाडीही रुळावर आली आहे.

सेलिब्रिटींचे दौरे

नाटकांचे, सांगीतिक कार्यक्रमांचे, महोत्सवांचे दौरे पुण्यात होत असून, त्यामुळे देश-विदेशातील कलाकार, तंत्रज्ज्ञ पुण्यात येत आहेत. महापालिकेच्या नाट्यगृहांसह खासगी नाट्यगृहांमध्ये असे कार्यक्रम होत असून, म्युझिक कॉन्सर्टसाठीही नामवंत सेलिब्रिटी पुण्याचा दौरा करीत आहेत. त्यामुळे सांस्कृतिक पर्यटनातून मिळणारे आर्थिक उत्पन्नही वाढले आहे. एका कार्यक्रमासाठी सांस्कृतिक संस्था 50 हजार रुपयांपुढील पैसा खर्च करीत असून, सांस्कृतिक संस्थांना त्यातून 50 हजार ते 1 कोटी रुपयांपर्यंत आर्थिक उत्पन्न मिळत आहे.

पर्यटकांची रांग देश-विदेशातून

अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, सिंगापूर आदी देशांसह राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, झारखंड आदी राज्यांतील पर्यटक पुण्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी पुण्याला भेट देत असून, देश-विदेशातील कलाकारांचे दौरेही पुण्यात होत आहेत.

मी मूळचा लातूर जिल्ह्यातील असून, सध्या कामाच्या निमित्ताने पुण्यात येत आहे. परंतु आता काही सांस्कृतिक कार्यक्रमांनाही उपस्थिती लावत असून, पुण्यात होणार्‍या म्युझिक कॉन्सर्टला मी जात असतो. पुण्यात खूप दर्जेदार कार्यक्रम होतात. त्यामुळेच येथील कार्यक्रमांना मी नक्कीच उपस्थित राहतो.

                                              – सोमेश्वर जाधव, पर्यटक

Back to top button