पिंपरी शहरातील मैदाने ओस; उन्हाच्या तडाख्याचा परिणाम | पुढारी

पिंपरी शहरातील मैदाने ओस; उन्हाच्या तडाख्याचा परिणाम

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : वार्षिक परीक्षा संपून शाळांना आता उन्हाळी सुट्ट्यांना सुरुवात झाली आहे. मात्र, यंदा उन्हाळा कडक असल्याने त्याचा परिणाम क्रीडा शिबिरांवरही झाला आहे. महापालिकेकडे सध्या 30 मैदाने विविध क्रीडा प्रकारांसाठी उपलब्ध आहेत; परंतु त्यातील केवळ चार ते पाच मैदानांवर क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. इतर सर्व मैदाने ओस पडली असल्याचे चित्र आहे.

सध्या सकाळ, संध्याकाळच्या जॉगिंग किंवा रोजचा व्यायाम करण्यासाठी नागरिक या मैदानांचा वापर करत आहेत. पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या ताब्यात असलेल्या 30 पैकी आठ मैदाने ही वेगवेगळ्या कारणाने बंद आहेत. काही मैदाने लॉन, सिंथेटिकच्या कामामुळे, तर काही ठिकाणी ब्लॉक टाकणे आणि स्थापविषयक कामे सुरू असल्यामुळे मैदाने वापरासाठी बंद आहेत. यातील दोन मैदाने सेवाशुल्क आणि भाडेतत्त्वावर दिली आहेत. तर, एक मैदान हे गावजत्रा किंवा कुस्तीसाठी वापर होतो.

क्रिकेट, हॉकी, कबड्डी, खोखो, फुटबॉल, व्हॉलिबॉल, टेनिस आणि स्केटिंग या क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण साधारणपणे उन्हाळी सुट्टीत आयोजित केले जाते; मात्र यंदा उन्हाच्या वाढत्या तडाख्याचा परिणाम या शिबिरांवर झाला आहे. सध्या पिंपरी, चिंचवड, निगडी, चिखली, मोशी, भोसरी, पिंपळे सौदागर, सांगवी आणि वाकड येथे उपलब्ध असलेली मैदाने महापालिकेच्या शाळा आणि क्रीडा प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध होतात. तर खासगी शाळांमधील बारावीपर्यंतचे विद्यार्थी, वरिष्ठ गटातील खेळाडू, वरिष्ठ महाविद्यालय किंवा क्रीडा संघटनांच्या खेळाडूंसाठी एक तासाला 25 रुपये आणि सात तासांंसाठी 300 रुपये शुल्क देऊन मैेदाने उपलब्ध होतात.

या मैदानांवर गर्दी…
नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास येथे महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी हॉकी प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. तसेच सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदान, शाहूनगर,चिंचवड येथील कै. सदाशिव बहिरवाडे मैदान, निगडी येथील मदनलाल धिंग्रा आणि चर्‍होलीतील श्री वाघेश्वर क्रीडा संकुल मैदानांवर कबड्डी, क्रिकेट आणि फुटबॉलची छोट्या प्रमाणावर शिबिरे सुरू आहेत.

उपनगरात मैदाने आवश्यक…
पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनेक खेळांसाठी मैदाने तयार केली आहेत. पण प्रत्येक उपनगरांत कबड्डी, क्रिकेट, हॉकी आणि फुटबॉल या चार प्रमुख क्रीडा प्रकारांच्या प्रशिक्षणासाठी मोठी मैदाने उपलब्ध करायला हवीत. सध्या असलेली मैदानांपैकी चारपाच मैदाने सोडली तर इतर मैदाने ही सर्व लहान आहेत. शिवाय ती मुख्य भागात उपलब्ध नाहीत.

सध्या उन्हाचा पारा चढत असल्यामुळे आणि सुटीतील शिबिरांचे नियोजन करायला थोडा वेळ लागतो. कारण सुटीतील क्रीडा प्रशिक्षणानंतर मुले करियर म्हणून संबंधित क्रीडा प्रकाराकडे पाहतात. म्हणून हे नियोजन कमी वेेळात जास्तीत जास्त कौशल्य शिकवणारे असावे लागते.
                                                  – आशुतोष सिंग, क्रीडा प्रशिक्षक

गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे क्रीडा शिबिरे झाली नाहीत. या वर्षी सुट्ट्या लागल्या; परंतु उन्हाळा कडक असल्याने आणि अवकाळी पावसाने कहर केल्यामुळे शिबिरांचे नियोजन नसल्यामुळे मैदानांचे बुकींग खूपच कमी झाले आहे.

                   – अनिल जगताप, क्रीडा पर्यवेक्षक ‘क’ क्षेत्रीय कार्यालय

 

Back to top button