वडगावच्या मेहताचा दूध भेसळप्रकरणी जामीन फेटाळला | पुढारी

वडगावच्या मेहताचा दूध भेसळप्रकरणी जामीन फेटाळला

बारामती(ता. बारामती); पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर पोलिस ठाण्यात दूध भेसळप्रकरणी दाखल गुन्ह्यात वडगाव निंबाळकर येथील समीर सुभाष मेहता याचा अटकपूर्व जामीन अर्ज पंढरपूर सत्र न्यायालयाने फेटाळला. पंढरपूरचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी मेहताची पार्श्वभूमी न्यायालयासमोर मांडली. मेहताचा गुन्ह्यात सुस्पष्ट सहभाग आहे, त्याच्यावर फलटण पोलिस ठाण्यात 2009 साली दूध भेसळप्रकरणी गुन्हा दाखल असल्याने तो सराईत गुन्हेगार आहे, भेसळयुक्त दुधामुळे देशात 87 टक्के नागरिक कर्करोगाला बळी पडत आहेत आदी मुद्दे न्यायालयासमोर मांडण्यात आले. त्यामुळे न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे, दक्षिणेची काशी आहे. मोठ्या प्रमाणावर भाविक भेट देतात. त्यामुळे अशा भेसळयुक्त दुधापासून भाविकांच्या जीवितास देखील धोका आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी हे श्रद्धेचे स्थान आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. 16 जानेवारी रोजी ही कारवाई झाली होती. पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला होता.

नीलेश बाळासाहेब भोईटे याच्याकडील दूध वाहतुकीचे वाहन तपासले असता ते परमेश्वर काळे (रा. फुलचिंचोली, ता. पंढरपूर) याच्या मालकीच्या स्वामी समर्थ दूधसंकलन केंद्राकडे चालले असल्याचे सांगण्यात आले. या वाहनाची तपासणी केली असता त्यात भेसळयुक्त दूध होते. हे द्रावण वडगाव निंबाळकर येथील समीर मेहता याने पुरविल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

याप्रकरणी सात जणांविरोधात पंढरपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये नीलेश बाळासाहेब भोईटे (रा. वृंदावन सोसायटी, टाकळी), गणेश हनुमंत गाडेकर (रा. टाकळी रोड, पंढरपूर), परमेश्वर सिद्धेश्वर काळे (रा. फुलचिंचोली, ता. पंढरपूर), शहाजी भैरू ढाळे (रा. दसूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) व स्वप्निल राजेंद्र गायकवाड (रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती) यांच्यासह मेहता व अन्य एकाचा समावेश आहे. यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली असून, अद्याप ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्यापैकी एकालाही अद्याप जामीन झालेला नाही. गुन्हा दाखल झाल्यापासून समीर मेहता हा फरार असून, पोलिस अद्याप त्याचा शोध घेत आहेत.

मेहतासमोर दोनच पर्याय
पंढरपूर पोलिसांच्या दृष्टीने फरार असलेल्या समीर मेहता याच्याकडे आता दोनच पर्याय उरले आहेत. एक तर तो पोलिसांपुढे शरणागती पत्करू शकतो किंवा उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जासाठी धाव घेऊ शकतो. त्याने उच्च न्यायालयात धाव घेतल्यास तेथेही त्याच्या जामीन अर्जाला कडाडून विरोध केला जाईल, असे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्याकडून सांगण्यात आले.

Back to top button