अभाविपकडून पुणे विद्यापीठात तोडफोड: आमदार रोहित पवार यांनी केला तीव्र शब्दांत निषेध | पुढारी

अभाविपकडून पुणे विद्यापीठात तोडफोड: आमदार रोहित पवार यांनी केला तीव्र शब्दांत निषेध

पुणे, पुढारी ऑनलाईन: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अश्लील रॅप साँग शूट केल्याचा आणि विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्न प्रलंबित ठेवणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात सोमवारी ट्रॅफिक जाम आंदोलन केले. परंतु, हे आंदोलन करत असताना त्यांनी विद्यापीठात तोडफोड केली. तसेच विद्यापीठ प्रशासनाच्या बैठकीत घुसून गोंधळ घातला. या घटनेचा अन्य विद्यार्थी संघटनांनी निषेध केला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे की, रॅपसाँग प्रकरणी चौकशी सुरू असताना मोठी शैक्षणिक परंपरा असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घुसून धुडगूस घालत केलेल्या तोडफोडी च्या कृत्याचा तीव्र निषेध! एरवी आपल्या रास्त शैक्षणिक मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करणारं सरकार, आज धुडगूस घालणाऱ्यांवर काय कारवाई करणार? असा सवाल देखील रोहित पवार यांनी विचारला आहे.

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये परवानगी नसताना अश्लील भाषेत केलेले रॅप साँग चे शूटिंग, शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या विद्यार्थ्यांचा न झालेला पदवी ग्रहण सोहळा, डिग्री सर्टिफिकेट न दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे परदेशातील प्रलंबित प्रवेश, परीक्षांचे प्रलंबित निकाल, लागलेल्या निकालांमध्ये चुका, क्रीडा संकुलाचे उद्घाटन होऊन देखील विद्यार्थ्यांना वापरण्यास बंदी, बीएस्सी बीएडच्या विद्यार्थ्यांना कमवा व शिका योजनेचा १००% लाभ न देणे या सर्व विषयांना घेऊन आंदोलन करण्यात आले. अभाविपच्या या कृतीचा अन्य विद्यार्थी संघटनांनी निषेध केला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Back to top button