पुणे : कुसेगावच्या शेतकर्‍याची शेणखतातून कमाई | पुढारी

पुणे : कुसेगावच्या शेतकर्‍याची शेणखतातून कमाई

पाटस : पुढारी वृत्तसेवा : कुसेगाव (ता.दौंड) येथील शेतकरी गणेश भोसले यांनी शेतीबरोबरच 15 गायींचा दूध व्यवसायाचा जोडधंदा जोपासला आहे. गायींपासून मिळणार्‍या शेणखतातून ते स्वत:च्या शेतीला तर खत टाकतातच शिवाय अन्य शेतक-यांनाही पुरवठा करत आहेत. उन्हाळ्यात शेतकरी पिके काढल्यानंतर जमिनी तापण्यासाठी ठेवतात. तसेच याकाळात शेणखतही जमिनीत मिसळले जाते. यंदा शेणखताच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मात्र, त्याप्रमाणात पुरवठा होत नसल्याने किंमतीत वाढ झाली आहे. अशावेळी गणेश भोसले त्यांच्याकडील शेणखत विक्री करून महिन्याकाठी चांगले उत्पन्न मिळवत आहेत.

त्यांच्याकडील 15 गायींपासून त्यांना दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेणखताची उपलब्धता होते. यंदा त्यांच्या चार एकर शेतीला सुमारे 1 लाख 30 रुपयांचे शेणखत त्यांनी टाकले. पाटस परिसरात शेणखताच्या एका डंपरला 3500 रुपये द्यावे लागतात. ज्या शेतक-यांकडे स्वत:चे शेणखत आहे, ते त्यांच्या शेतीला घालतात. मात्र, ज्यांच्याकडे शेणखत उपलब्ध नाही ते मात्र शेणखताच्या शोधात आहेत. त्यांना गणेश भोसले यांच्याकडून शेणखताचा पुरवठा केला जात आहे.

दुग्धव्यवसायातून तिहेरी उत्पन्न
गणेश भोसले हे आपल्या गाईपासून पाच महिने मिळणारे शेणखत जमा करून आपल्या शेतीला घालतात. त्यातून एकरी 25 हजार रुपयांचा खतांचा खर्च वाचवतात. उरलेल्या शेणखताची ते 3500 रुपयांप्रमाणे विक्री करत आहेत. परिणामी, दूध व्यवसायातून ते दूध, शेतीला शेणखत व त्याची विक्री असे तिहेरी उत्पन्न मिळवत आहेत.

Back to top button