

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : किवळे येथील होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या व जखमींच्या नातेवाइकांना तात्काळ मदत करणे अपेक्षित असतानाही महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह त्याकडे दुर्लक्ष करून असंवेदनशीलतेचा कळस करत आहेत. अद्याप पालिकेने आर्थिक मदत दिलेली नाही. या दुर्घटनेतील नागरिकांना आयुक्तांनी मदत करण्यापासून आयुक्तांना कोणी रोखले आहे का? असा सवाल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शुक्रवारी (दि.21) केली आहे.
किवळे येथील अनधिकृत होर्डिंग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला. तर, तिघे जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि.17) घडली. त्यासंदर्भात अजित गव्हाणे यांनी आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. गव्हाणे म्हणाले की, महापालिका प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे किवळे येथील दुर्घटना घडली आहे. पालिका आयुक्त हेच सध्या प्रशासक म्हणून महापालिकेचे प्रमुख आहेत.
दुर्घटना घडल्यानंतर मृतांच्या व जखमींच्या नातेवाइकांना मदत घोषित करणे अपेक्षित होते. मात्र,अद्यापपर्यंत आयुक्तांनी ही मदत घोषित केलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये पालिकेच्या कारभाराबाबत व आयुक्तांबाबत नाराजी आहे. आयुक्तांना ही मदत जाहीर करण्यापासून कोणी रोखले आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेचे प्रमुख या नात्याने आयुक्तांनी तात्काळ मदत घोषित करावी. महापौर निधीतून मदत द्यावी. तसेच यापुढे शहरात एकही अनधिकृत होर्डिंग उभे राहू नये, यासाठी धोरण तयार करावे. होर्डिंगला परवानगी देण्याची सध्याची पद्धत अतिशय किचकट असून, त्यामुळे सुटसुटीतपणा आणावा. सध्या अस्तित्वात असलेल्या व नव्याने परवानगी दिल्या जाणार्या प्रत्येक होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.