उन्हाचा जुन्नरच्या पर्यटन व्यवसायाला फटका | पुढारी

उन्हाचा जुन्नरच्या पर्यटन व्यवसायाला फटका

ओतूर: पुढारी वृत्तसेवा :  जुन्नर तालुक्यात अनेक नैसर्गिक पर्यटनस्थळे आहेत. हजारो पर्यटक या पर्यटन स्थळांना भेट देत असतात. मात्र यंदा वाढत्या उन्हामुळे या पर्यटन स्थळांकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी येथील छोट्या, मोठ्या व्यावसायिकांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे. ढगाळ वातावरण, आग ओकणारी सूर्यदेवता, झाडांची गळून पडलेली पाने, जंगल भागातील वेगाने नष्ट झालेली हिरवाई, पिण्याच्या पाण्याचे थांबलेले नैसर्गिक स्रोत आदी प्रमुख कारणे पर्यटकांना घरातच थांबण्यास प्रवृत्त करीत असावीत, असा अंदाज व्यक्त होत आहे. जुन्नर तालुक्यात शिवनेरी, लेण्याद्री, ओझर, हरिशचंद्र गड, नाणेघाट, माळशेज घाट, पिंपळगाव जोगा धरण परिसर, वडज धरण, येडगाव धरण आदी अनेक पर्यटनस्थळे आहेत. आजमितीला कडक उन्हामुळे ती ओस पडली आहेत.

परिणामी पर्यटन स्थळाजवळ असलेले सर्व व्यवसाय डबघाईला आले आहेत. प्रामुख्याने फार्म हाऊस, हॉटेल, लॉजिंग बोर्डिंग, रसवंतीगृह, आईस्क्रीम पार्लर, कॉर्नफ्लावर विक्री, खेळणी, रानमेवा विक्रेते आणि फळविक्रेत्यांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे.
या भागात सर्वच जण उन्हाच्या तडाख्याने तावून-सुलाखून निघत आहेत. येत्या काही दिवसात उन्हाचा तडाखा कमी झाला नाहीतर या विविध व्यवसायातील कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळणार आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप दीड महिना बाकी आहे. जूनच्या 15 तारखेपर्यंत पाऊस येणे अपेक्षित आहे, यंदा वेळेत पाऊस पडेल असे जाणकार लोक सांगत असले तरी तूर्तास सर्व पर्यटनस्थळे ओस पडली आहेत.

दोन महिन्यांपासून बोहनीच नाही
गेल्या दोन महिन्यांपासून बोहनीच झाली नाही. माळशेज घाटातील धबधबे सुरू झाल्यास व्यवसाय पूर्ववत होतील, असे डोंगरे फार्महाऊसचे व्यवस्थापक भाऊराव साठे यांनी सांगितले.

 

 

Back to top button