मोगर्‍याचे पीक संकटात ; हवामान बदलाचा फटका | पुढारी

मोगर्‍याचे पीक संकटात ; हवामान बदलाचा फटका

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा :  मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदलाचा विपरीत परिणाम फूल शेतीवर झाला आहे. फूल उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक उत्पन्नदेखील घटले आहे. मागील पंधरा दिवसांपासून वातावरणात मोठा बदल पहावयास मिळत असून, दिवसभर कडाक्यांचे ऊन पडत असून, दुपारनंतर ढगाळ वातावरण होत आहे. सायंकाळी हलका पाऊस पडतो. पहाटे थंडी पडत आहे. दवामुळे फूलकळी येत नाही. मागील काही वर्षांपासून शेतकरी मोगरा फुलाची शेती करीत आहेत. उन्हाळ्यात मोगऱ्याला चांगली मागणी असते. त्यामुळे दररोज सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत कळीची तोडणी करून, बाजारपेठेमध्ये घेऊन जात आहेत.

मोगरा फुलाला सद्यःस्थितीत एक हजार ते बाराशे रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. लग्नसराई व तिथीनुसार बाजारभाव मिळतो असे शेतकरी किसन पवार यांनी सांगितले. दरम्यान, मागील महिन्यात दहा गुंठे शेतात, मोगरा फुलांचे दिवसाला 8 ते 9 किलोपर्यंत उत्पादन मिळत होते. सद्यःस्थितीत बदललेल्या वातावरणामुळे हेच उत्पन्न फक्त एक ते दीड किलोपर्यंत मिळत आहे. पुण्याच्या बाजारात या मोगर्‍याला एक हजार ते बाराशे रुपये प्रतिकिलो असा भाव मिळत आहे. मात्र, ऐन हंगामात वातावरणातील बदलाने फूल उत्पादनात मोठी घट झाली आहे. याचा परिणाम आर्थिक उत्पन्नावर झाला आहे असे किसन पवार, सागर भुजबळ, अनिल राऊत, उमेश राऊत, ज्ञानेश्वर राऊत आदी शेतकऱ्यांनी सांगितले. फफफ

Back to top button