अक्षयतृतीयेमुळे शेतमालाची आवक रोडावली | पुढारी

अक्षयतृतीयेमुळे शेतमालाची आवक रोडावली

शंकर कवडे : 

पुणे : अक्षयतृतीयेमुळे फळभाज्यांची तोड न झाल्याने रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये फळभाज्यांची आवक घटली. अक्षयतृतीया व रमजानच्या सणामुळे मागणी कमी राहिल्याने बाजारातील आवक घटूनही फळभाज्यांचे भाव गतआठवड्याच्या तुलनेत टिकून राहिल्याचे सांगण्यात आले. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी (दि. 23) अवघी 90 ट्रकमधून शेतमालाची आवक झाली. परराज्यातील कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे 6 ते 7 टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून 3 ते 4 टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश, आंध्रप्रदेश व तामिळनाडू येथून 4 टेम्पो शेवगा, कर्नाटक येथून 2 टेम्पो घेवडा, सिमला येथून 1 ट्रक मटार, कर्नाटकातुन 4 टेम्पो तोतापुरी कैरी, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे 14 ते 15 टेम्पो ट्रक आवक झाली होती.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 700 ते 800 गोणी, टोमॅटो 9 ते 10 हजार क्रेटस, कोबी 4 ते 5 टेम्पो, काकडी 8 ते 10 टेम्पो, भेंडी आणि गवार प्रत्येकी सुमारे 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 10 ते 12 आणि फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, गाजर 6 ते 7 टेम्पो, मटार 100 गोणी, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, कांदा सुमारे 100 ते 110 ट्रक, इंदौर, आग्रा, गुजरात आणि स्थानिक भागातून बटाट्याची 40 ट्रक आवक झाली होती.

Back to top button