सिंहगड रोड भागातील पथदिवे बंद | पुढारी

सिंहगड रोड भागातील पथदिवे बंद

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा :  हिंगणे खुर्द, विठ्ठलवाडी व सिंहगड रोड परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवरील, तसेच जॉगिग ट्रॅकवरील अनेक पथदिवे बंद आहेत. या भागात रात्रीच्या अंधारात चोर्‍या, घरफोड्यांच्यो प्रकारांसह वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे दिव्यांच्या दुरुस्तीसाठी पुरेसा निधीच मिळत नसल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे.

विठ्ठलवाडी येथील श्री विठ्ठल मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर डॉ. निरगुडकर दवाखान्याजवळ गेल्या अनेक दिवसांपासून पथदिवे बंद आहेत. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही. खोरड वस्ती रोड, दामोदरनगर, महादेवनगर, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे जाणार्‍या रस्त्याजवळील मुठा कालव्यावरील जॉगिंग ट्रॅक आदी ठिकाणचे पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत. यामुळे परिसरात घरफोड्या, चोर्‍यांसह गुन्हेगारी वाढली आहे. माजी उपमहापौर प्रसन्न जगताप म्हणाले की, बंद पथदिवे सुरू करण्यासाठी वांरवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. गेल्या सहा महिन्यांपासून जॉगिंग ट्रॅकवरील निम्म्याहून अधिक पथदिवे बंद आहेत, त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व मुलांना गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे.

दिव्यांची दुरुस्ती तातडीने करणार
आयुक्त प्रदीप आव्हाड म्हणाले की, पथदिव्यांची दुरुस्ती करण्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. अनेक दिव्यांची मोडतोड झाली आहे. उपद्रवी लोक जाणीवपूर्वक दिव्यांचे नुकसान करत आहेत. दिव्यांच्या दुरुस्तीसाठी मंजूर निधी मिळाला नसल्याने काम थांबले होते. आता निधी मंजूर होणार असून, दिव्यांची दुरुस्ती तातडीने करण्यात येईल.

Back to top button