पुणे : वाघोलीत शासकीय जागा हडपण्याचा डाव ? | पुढारी

पुणे : वाघोलीत शासकीय जागा हडपण्याचा डाव ?

वाघोली : वाघोली-भावडी रस्त्यावर असलेल्या एका सोसायटीलगत राज्य सरकारची (महसूल विभाग) जागा आहे. या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने मुरूम टाकून सपाटीकरण करण्यात आले आहे. मात्र, याबाबत महसूल विभाग अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. पुणे-नगर महामार्गाला जोडणार्‍या वाघोली-भावडी रोडवरील एका सोसायटीच्या लगत (गट नं. 229, प्लॉट नं. 4) महसूल विभागाची जागा आहे. ही जागा तीन बाजूंनी सीमाभिंत, तर एका बाजूने पत्रे लावून संरक्षित केली होती. या जागेचे नुकतेच जेसीबीच्या साहाय्याने मुरूम टाकून सपाटीकरण करण्यात आले.

जेसीबीचालकाने या ठिकाणी सोसायटीचे गार्ड तयार करायचे असल्याने सपाटीकरण करण्यात येत असल्याचे सांगितले. या जागेच्या सीमाभिंतीवर ‘ही जागा शासकीय मालकीची असून, अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई केली जाईल’ असा फलक लावला आहे. तरीसुद्धा या जागेवर बिनधास्त मुरूम टाकून सपाटीकरण केले जात आहे. ही जागा हडपण्याचा प्रयत्न केला जात असून, याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. याबाबत सोसायटीच्या पदाधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.

सीमाभिंत तोडून तयार केला रस्ता
या जागेला लागूनच सोसायटीची सीमाभिंत असून, ती तोडून या जागेमध्ये येण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. यावरून ही जागा हडप करण्याचा प्लॅन केला असल्याचा दिसून येते. मात्र, महसूल विभागाच्या अधिकार्‍यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. संबंधित अधिकार्‍यांनी या जागेवर अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

वाघोली येथे अनेक ठिकाणी शासकीय भूखंड असून, त्यावर अतिक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोकळ्या भूखंडावर रात्रीच्यावेळी गैरप्रकार, अवैध धंदे, अनुचित घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.
– प्रल्हाद वारघडे, प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय माहिती सेवा समिती

महसूल विभागाच्या जागेवर अतिक्रमण होत असल्याबाबतची माहिती मिळाली आहे. याबाबत तहसीलदार व मंडल अधिकार्‍यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
– संजय असवले, प्रांतधिकारी, हवेली

Back to top button