पुणे स्थानकातील अतिरिक्त मार्ग बंद करा ; सल्लागार समितीच्या सदस्यांचा बैठकीत सूर | पुढारी

पुणे स्थानकातील अतिरिक्त मार्ग बंद करा ; सल्लागार समितीच्या सदस्यांचा बैठकीत सूर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजले आहेत. येथे सुरक्षा नावाचा प्रकारच राहिलेला नाही, स्थानकात जाणारे अनेक खुश्कीचे मार्ग तयार झाले आहेत. त्याकडे रेल्वे प्रशासन का दुर्लक्ष करत आहे, ते मार्ग अगोदर तातडीने बंद करा, अशी जोरदार मागणी पुणे रेल्वे स्थानक सल्लागार समितीच्या सदस्यांनी बुधवारी केली. पुणे रेल्वे स्थानक सल्लागार समितीची बैठक बुधवारी दुपारी चारच्या सुमारास झाली. या वेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, पुणे रेल्वे स्थानकाचे स्टेशन डायरेक्टर मदनकुमार मीना, रेल्वे सुरक्षा बलाचे बी. एस. रघुवंशी, लोहमार्ग पोलिस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, जनसंपर्क अधिकारी अजय कुमार, मुख्य वाणिज्य निरीक्षक शिवबहाद्दूर सिंग व सल्लागार समितीचे सदस्य आनंद सप्तर्षी, गणेश यादव, सागर गायकवाड, संतोष राजगुरू व अन्य उपस्थित होते.

तसेच, या वेळी रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेसह पुणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास, यार्ड रिमॉडलिंग, स्थानकाच्या प्रवेशद्वारावर कायमस्वरूपी दोन आरपीएफ जवान तैनात करणे, स्थानकावर अतिरिक्त आणि अत्याधुनिक स्वरूपाचे सीसीटीव्ही बसवणे यांसारख्या अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यावर लवरच उपाययोजना करण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले.

वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापकांची तत्काळ कारवाई
रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत आक्रमक झालेल्या सदस्यांनी रेल्वे स्थानकाचा मुद्दा उपस्थित करत, स्थानकात जाणारे मार्ग बंद करण्याची मागणी केली. याबाबत गांभीर्याने दखल घेत, बैठकीला उपस्थित असलेले वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांनी बैठक संपताच स्थानकाची पाहणी केली. या वेळी स्थानकावर त्यांना एका कँटीनमधून रेल्वे स्थानकात प्रवेश करता येणारा मार्ग दिसला. त्या वेळी त्यांनी तत्काळ कँटीन व्यवस्थापकाला बोलावून चांगलेच सुनावले. आणि हा मार्ग साखळी लावून बंद करण्यास सांगितले. मात्र, हा मार्ग आता किती दिवस बंद राहणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Back to top button